Teacher, headmaster from Shirpur area,  trapped of the  'Corona'
Teacher, headmaster from Shirpur area, trapped of the 'Corona'

शिरपूर परिसरातील शिक्षक, मुख्याध्यापक `कोरोना’च्या फेऱ्यात

शिरपूर, जि. धुळे: नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू असतानाच शहर व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, आश्रमशाळांचे शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत.

शिरपूर, जि. धुळे : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू असतानाच शहर व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, आश्रमशाळांचे शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना वर्गात पाठवणे कितपत सुरक्षित आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या. त्यात मोठ्या संख्येने अहवाल निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख तळाशी आला. मात्र, तीन दिवसांत रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये खासगी शाळेचे मुख्याध्यापक, आश्रमशाळेचे शिक्षक कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले.

सूक्ष्म नियोजन कितीही अद्ययावत असले, तरी कोरोनाचा संसर्ग कायम राहील, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर वर्ग सुरू केल्यानंतर न टाळता येणाऱ्या परस्पर संपर्कातून कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील, असा प्रश्न आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचशा शिक्षकांकडून त्याचे पालन होत नाही. 

स्वॅब दिलेले उघड्यावर फिरतात, लग्नसमारंभात सहभागी होतात. त्यांच्याकडून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशाच बेशिस्तीमुळे शिरपूर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे स्वॅब घेतल्यानंतर निगेटिव्ह चाचणी येईपर्यंत संबंधित विलगीकरणात राहतील, याचे मॉनिटरिंग करणारी यंत्रणा उभारण्याचीही गरज आहे. 

समारंभ ठरणार माध्यम 

कार्तिकी एकादशीनंतर होणाऱ्या विवाह समारंभांची संख्या आणि नियम, दक्षता धाब्यावर बसवून मिरवणूक, जेवणावळीतील गर्दी धडकी भरवणारी आहे. अशा समारंभात बाहेरगावच्या व स्थानिक मंडळींचा आपसांतील संपर्क संसर्ग पसरवण्याची दाट शक्यता आहे.

केवळ मास्क, सॅनिटायझर अशी प्राथमिक साधने या कार्यक्रमांत वापरली जातात आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला मात्र सरसकट हरताळ फासला जातो, ही बाब वारंवार दिसून आली. त्यामुळे लग्नांची तिथी जितकी मोठी तितकीच कोरोनाचा आलेख उंचावण्याची शक्यताही  मोठी ठरू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com