नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कृषिपूरक
स्वच्छ, सुरक्षित दूध उत्पादनाचे तंत्र
असुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा, बृसेल्लोसीस, स्कारलेट ताप, आंत्रदाह सारखे अनेक मानवी आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणून स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादन करणे गरजेचे आहे.
असुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा, बृसेल्लोसीस, स्कारलेट ताप, आंत्रदाह सारखे अनेक मानवी आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणून स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादन करणे गरजेचे आहे.
जागतिक बाजारपेठेत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची रासायनिक गुणवत्ता आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण कटाक्षाने तपासले जाते. आपले पशुपालक ही गुणवत्ता राखण्यास कमी पडतात. अस्वच्छ दुधामुळे टिकवण क्षमता कमी होते. हे लक्षात घेऊन मानवी आणि पशू आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन महत्त्वाची बाब आहे.
दूध काढणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य
- दूध काढणारी व्यक्ती निरोगी असावी. त्यास कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार अथवा जखम नसावी.
- व्यक्तीला थुंकणे, गुटखा/तंबाखू खाणे, सिगारेट/बिडी पिणे या सारख्या वाईट सवयी नसाव्यात.
- वैयक्तिक स्वच्छता राखावी. नखे वाढू देऊ नये. कपडे स्वच्छ असावेत.
- जनावरांचे आरोग्य, कासेची निगा, स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादन इत्यादी विषयी जागरूक असावी.
जनावरांचे आरोग्य
- दुधाळ जनावरे निरोगी असावीत.
- दुधावाटे पसरू शकणाऱ्या तसेच मानवात प्रादुर्भाव करू शकतील अशा कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून मुक्त असावीत.
- जनावरांना स्वच्छ आणि तणावमुक्त ठेवावे.
- नियमित जंतनाशन आणि लसीकरण करावे.
- उपचारात संप्रेरके आणि प्रतिजैविके वापरल्यास त्यांचे दूध इतर दुधात मिसळू नये.
वैरण आणि पाण्याची गुणवत्ता
- दूध काढताना कोरडी वैरण खाण्यास देऊ नये.
- दुधाळ जनावरांना उग्र वास असलेली तसेच विषारी वैरण देऊन नये.
- वैरण स्वादिष्ट आणि सकस असावी.
- पिण्याचे पाणी ताजे आणि नितळ असावे. हिवाळ्यात कोमट तर उन्हाळ्यात थंड असावे.
- पाण्यात कीटकनाशके, संप्रेरके आणि प्रतिजैविके यांचा अंश नसावा.
दूध काढण्याची जागा
- जागा हवेशीर, आरामदायक आणि स्वच्छ असावी.
- जागा जनावराच्या ओळखीची, शांत, ताणमुक्त आणि प्रसन्न असावी.
- गोठ्यातच दूध काढत असल्यास, गोठा धूळ मुक्त असावा. शेण-मूत्र साचू देऊ नये. अन्यथा दुधास त्याचा वास येतो.
- दूध काढताना कीटक, माशा इत्यादींचा उपसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- गोठ्यात ठिकाणी चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी/मूत्र साचू नये म्हणून योग्य प्रमाणात उतार असावा.
कासेचे आरोग्य
- दुधाळ जनावराची कास निरोगी असावी.सुप्त किंवा दृष्य कासदाह नसावा.
- कास आणि सडाला इजा होऊ नये याची दक्षता घ्यावी.
- कासेवर केस नसावेत.
दुधाचे भांडे
- भांडे स्टीलचे असावे. तांबे, पितळी, लोखंडी किंवा गंजणारे नसावे.
- बादलीत दूध काढू नये. अन्यथा वातावरणातील घाण पडून दूध अस्वच्छ होते.
- निमुळत्या तोंडचे भांडे वापरावे. जेणेकरून दुधात वातावरणातून जिवाणू आणि घाण जाण्यास प्रतिबंध होईल.
- भांड्यास जोड नसावा.
- भांड्याच्या कडेला शिळ्या दुधाचा अंश नसावा.
- कोमट पाण्यात धुण्याचा सोडा वापरून भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर क्लोरिन युक्त पाण्याने धुवून उन्हात कोरडी करावी.
दूध काढण्याअगोदरची तयारी
- गोठ्यातील शेण,मूत्र काढून टाकावे. जनावरास खरारा करावा.
- दूध काढण्याची जागा स्वच्छ करून त्यावर पाणी शिंपडावे जेणेकरून धूळ उडणार नाही.
- दूध काढताना जनावरास ओली वैरण अथवा अलप द्यावा.
- जनावराचे पाय इंग्रजी आठ प्रमाणे बांधून त्यात शेपटी अडकवावी जेणेकरून शेपटी हलविल्यास दुधात घाण पडणार नाही.
- कास आणि सडे कोमट (५० ते ५५अंश सेल्सिअस) पाण्यात १ टक्के पोटॅशियम परमॅंगनेट मिसळून हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यावी. पान्हा सुटण्यासाठी धुताना मालिश करावे. कास नरम कापडाने कोरडी पुसून घ्यावी.
- हात स्वच्छ साबण पाण्याने धुवून कोरडे करावेत. डोक्यावर टोपी आणि नका-तोंडावर मास्क लावावा.
दूध काढण्याची पद्धत
- दूध करताना हाताची पूर्ण मूठ करून दूध काढावे. अंगठा मुडपून दूध काढू नये.
- सुरवातीच्या दोन धारा वेगळ्या काढाव्यात. त्यात जिवाणू संख्या जास्त असल्याने दुधात मिसळू नये. सुरवातीच्या धारा जमिनीवर टाकू नयेत.
- दूध काढताना सडाला पिळावे. ओढू नये.
- कासेतून पूर्ण दूध काढावे. शेवटचे दूध बोटांच्या चिमटीने पूर्णपणे काढावे.
- दोहन पद्धती स्वच्छ असावी. दुधात बोटे बुडवून सडांना मालिश करू नये.
- दोहन करतेवेळी शिंकू, खोकाळू किंवा थुंकू नये.
- दूध कमीत कमी वेळेत (५ ते ८ मिनिटे) काढावे. उत्पादनात थोडी वाढ होते.
- पान्हा सुटण्यासाठी वासरू सोडण्याची सवय लावू नये.
- दूध काढण्यासाठी यंत्र वापरत असल्यास यंत्राची टाकी आणि नळ्या स्वच्छ असाव्यात. यंत्रात ४० ते ५० कोलो पास्कल निर्वात पातळी तयार व्हावी आणि दर मिनिटास वात-निर्वात क्रम संख्या ५० ते ६० असावी. जास्त निर्वातामुळे कासेस इजा होण्याची शक्यता असते.
- दोन दूध काढण्या दरम्यानचा कालावधी सारखा असावा.
दूध काढल्यानंतरची दक्षता
- दूध काढल्यानंतर चारही सडे जंतुनाशक द्रावणात बुडवून घ्यावीत.
- दूध काढल्यानंतर दुग्ध नलिकेतील झापडा काही काळ उघड्या राहातात. जनावर लगेच खाली बसल्यास त्यामधून घाण, जिवाणू कासेत शिरण्याची शक्यता असते. म्हणून जनावरास वैरण टाकावी जेणेकरून ते अर्धा तास खाली बसणार नाही.
दुधाची साठवण
- दूध गोठ्यात ठेऊ नये. कारण त्यास शेण,मूत्राचा वास लागतो.
- दूध काढल्यानंतर ते स्वच्छ चाळणी किंवा फडक्यातून गाळून घ्यावे.
- दुधास थंड तापमानावर ठेवावे. जेणेकरून त्यात जिवाणू वाढ होणार नाही.
जिवाणू संख्या | दुधाची प्रत |
१ लक्ष प्रती मि.लि. आणि कमी | १ |
१ ते ३ लक्ष प्रती मि.लि | २ |
३ लक्ष प्रती मि.लि. पेक्षा जास्त | ३ |
- ताज्या दुधातील एकूण जीवाणूसंख्या १०००० प्रती मिलि पेक्षा जास्त नसावी.
- ताज्या दुधातील एकूण कोलीफोर्म जीवाणू संख्या ५० प्रती मिलि पेक्षा जास्त नसावी.
तापमान (अंश सेल्सिअस | जिवाणू वाढीचा दर (पटीत) |
२५ | १,२०,०००.०० |
२० | २००.०० |
१५ | १०.०० |
१० | १.०८ |
५ | १.०५ |
० | १.०० |
ताज्या दुधाचे गुणधर्म
- रंग : पिवळट पांढरा (गाय), शुभ्र (म्हैस)
- सामू : ६.५ ते ६.७
- १५.६ अंश सेल्सिअस तापमानावर विशिष्ट गुरुत्व (लॅक्टोमीटर): १.०१८ ते १.०३६ (गाय), १.०१८ ते १.०३८ (म्हैस)
- २० अंश सेल्सिअस तापमानावर दुधाचे घनत्व (हायड्रोमीटर) : १.३३४० ते १.३४८५
- दुधाचा उत्कल बिंदू : १००.१७ अंश सेल्सिअस
- दुधाचा गोठण बिंदू : -०.५१२ ते -०.५७२ अंश सेल्सिअस. (गाय), -०.५२१ ते -०.५७५ अंश सेल्सिअस (म्हैस)
दुधाचा गोठण बिंदू आणि अपमिश्रीत पाण्याचे प्रमाण यांचा संबंध
गोठण बिंदू (अंश सेल्सिअस) | अपमिश्रीत पाण्याचे प्रमाण (टक्के) |
- ०.५०० | ८.१ |
- ०.५१० | ६.३ |
- ०.५२० | ४.४ |
- ०.५३६ | १.५ |
- ०.५३८ | १.१ |
सोमाटिक पेशी संख्या आणि दुधाची गुणवत्ता
सोमाटिक पेशी संख्या | दुधाची प्रत |
१ लक्ष प्रती मि.लि. पेक्षा कमी | १ |
१ ते २ लक्ष प्रती मि.लि | २ |
२ ते ३ लक्ष प्रती मि.लि | ३ |
३ लक्ष प्रती मि.लि. पेक्षा जास्त | ४ |
संपर्क ः डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९,
डॉ. महेश कुलकर्णी ९४२२६५४४७०
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
- 1 of 34
- ››