साग रोपांच्या निर्मितीचे तंत्र

सागाची रोपनिर्मिती बिया आणि स्टंपपासून केली जाते. रोपनिर्मिती गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. याचबरोबरीने रूट ट्रेनरमध्ये बियांची लागवड करून दर्जेदार रोपनिर्मिती करता येते.
Creation of teak seedlings in root trainer
Creation of teak seedlings in root trainer

सागाची रोपनिर्मिती बिया आणि स्टंपपासून केली जाते. रोपनिर्मिती गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. याचबरोबरीने रूट ट्रेनरमध्ये बियांची लागवड करून दर्जेदार रोपनिर्मिती करता येते. साग हा उष्ण कटिबंधातील वृक्ष आहे. साग लागवडीसाठी साधारणपणे उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. चांगल्या वाढीसाठी १० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आणि ५०० ते २५०० मिमी पाऊस असलेल्या क्षेत्रामध्ये लागवड करता येते. अधिक तापमान आणि कमी पावासाच्या विभागामध्ये सागाची हळूहळू वाढ होते. परंतु उत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड तयार होते. सागाच्या लागवडीसाठी थोडी फार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असलेली, खडकाळ किंवा मुरमाड जमीन चालते. मध्यम ते भारी प्रत, ६.५ ते ७.५ सामू आणि १.५ ते २ मीटर खोलीची जमीन चांगल्या वाढीसाठी उत्तम राहते. काळी, चिकट तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. भारतामधील सागाचे प्रकार 

  • निलंबूर साग (केरळ) : चांगले आकारमान, जहाज बांधणीसाठी उपयुक्त. केरळच्या निलंबूर येथील सागवान हे उत्कृष्ट लाकूड, टिकाऊपणा आणि कीड प्रतिरोधक म्हणून प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळे या सागवानाला जीआय टॅग मिळाला आहे.
  • आलापल्ली साग (महाराष्ट्र) : चांगला रंग आणि योग्य संरचना.
  • सिवनी आणि बस्तर साग (मध्य प्रदेश): स्वर्णपित व सारकाष्ठ आणि रसकाष्ठचे एकत्रित मिश्रण.
  • गोदावरी खोऱ्यातील साग (आंध्र प्रदेश) : सजावट आणि उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी
  • अदिलाबाद साग (तेलंगाणा) : गुलाबी रंगाचे सरकाष्ठ
  • रोपनिर्मितीचे तंत्र  बिया, स्टंप (खोडमूळ) आणि टिशुकल्चर पद्धतीने साग रोपनिर्मिती केली जाते. रोपवाटिकेमध्ये सागाची रोपे तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि अधिक प्रमाणात कार्बोदके असणारी जमीन उपयुक्त आहे. बियांद्वारे रोपनिर्मिती 

  • साग बीजांवर कठीण प्रकारचे आवरण असल्यामुळे उगवण क्षमता खूप कमी (३० टक्यांपेक्षा कमी) असते. यासाठी थंड पाण्यामध्ये २४ तास साग बियाणे भिजवून पुढचे २४ ते ३६ तास सिमेंटच्या किंवा टणक पृष्टभागावरती पसरून कडक उन्हात वाळवण्याची क्रिया ३ ते ४ आठवडे केल्याने उगवणक्षमता वाढविण्यास (७० टक्के) मदत होते.
  •  रोपनिर्मितीसाठी १४ मिमी किंवा त्यापेक्षा अधिक व्यास असणाऱ्या बिया निवडाव्यात. यामुळे अधिक प्रमाणात बीजांकुरण मिळते.
  • गादी वाफे करताना चांगले कुजलेले शेणखत योग्य प्रमाणात मातीमध्ये मिसळून घ्यावे. बिया रुजण्यासाठी १० मीटर लांब, १ मीटर रुंद आणि ०.५ मीटर उंच आकाराच्या गादी वाफ्यावर १० सें.मी. अंतरावर ५ सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे. सुमारे ४० दिवसांनंतर बीज अंकुरण होते.
  • अलीकडे रूट ट्रेनरमध्ये बिया लावल्या जातात. ज्यामधे रूट क्वाइलिंगसारख्या समस्या दिसत नाहीत. ६ ते ७ महिन्यांमध्ये रोपे लावण्यासाठी तयार होतात.
  • स्टंपपासून रोपनिर्मिती 

  • खोडमूळ तयार करण्यासाठी १० ते १२ महिन्यांची रोपे (खोडाची जाडी १.५ सें.मी. ते २ सें.मी.) पाण्याने भिजवलेल्या गादीवाफ्यावरून मुळासहित उपटावीत.
  • तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाच्या खोडावरील २ ते ३ सें.मी. वर तिरपा काप देऊन मुळाकडील २० ते २५ सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा.
  • तिरपा काप देताना रोपाची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. तयार केलेल्या खोडमुळास ओल्या बारदान्यामध्ये ठेवून
  • जितक्‍या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले असते.
  • फायदेशीर वनशेती पद्धती 

  • कृषिवन पद्धतीमध्ये खरीप हंगामात मका, कापूस, सोयाबीन, उडीद, भुईमूग आणि मूग इत्यादी, तर रब्बीमध्ये तीळ, हरभरा, ज्वारी या पिकांची लागवड करता येते.
  • सावलीचे प्रमाण वाढल्यानंतर हळद, आले किंवा औषधी वनस्पतींची लागवड करता येते.
  • मिश्र वनशेतीमध्ये सागासोबत लिंबू, पेरू, आंबा आणि बांबू लागवड करता येते.
  • जिरायती जमिनीमध्ये वन-चारा पद्धतीमध्ये नेपियर, दिनकर, गिन्नी, स्टायलो, अंजन आणि धामन गवताची लागवड करावी. तसेच शेती बांधावर साग लागवड (२ ते ३ मी अंतर) करता येते. ज्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार नाही. ऊन, वाऱ्यापासून पिकाला संरक्षण मिळते.
  • साग हा पर्णझडी असल्यामुळे वनशेतीमध्ये सुमारे २ ते ३ टन पाला जमिनीमध्ये कुजवला जातो. जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या बरोबरच पिकांची पोषक घटकांची गरज पूर्ण करते.
  • संपर्क ः संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com