शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तंत्रज्ञान विकसित करावे : डॉ. बालसुंदरम

Dr. Balsundarm
Dr. Balsundarm

परभणी: डिजिटल शेतीअंतर्गत अॅग्रीबोट, ड्रोन तंत्रज्ञानामुळे कीड, रोग, पीक व्यवस्थापन विषयक समस्यांची उकल करण्यासोबतच शेतातील पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक उपयुक्त सल्ला आणि माहिती पोचवण्यासाठी मोबाईल अॅप विकसित करावे लागतील. येत्या काही वर्षांत डिजिटल शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करणे शेतकऱ्यांना शक्य होईल. स्मार्ट शेतीमुळे तरुण वर्ग शेतीकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मलेशियातील पुत्रा विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवा. के. बालसुंदरम यांनी केले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प आणि प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रअंतर्गत वसंतराव कृषी विद्यापीठामध्ये कार्यान्वित कृषी उत्‍पादकता वाढीसाठी यंत्रमानव (रोबोट), ड्रोन आणि स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती याविषयावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍प यांच्यातर्फे आयोजित तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात शुक्रवारी (ता.१३) ते बोलत होते.  वसंतराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. इस्त्रोमधील माजी अभियंता तथा राष्ट्रीय अंतराळ संस्थेचे अंतराळ दूत डॅा. अविनाश शिरोडे, आयआयटी मुंबई येथील प्रा. आर. माचावरम, खरगपूर येथील ए. के. देब, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे आदींची उपस्थिती होती. डॉ. बालसुंदरम पुढे म्हणाले की, सन २०१५ पासून काटेकोर शेती पद्धतीचे रूपांतर डिजिटल शेतीमध्ये होत आहे. किमान निविष्ठांचा वापर करून अधिक उत्पादन मिळू शकेल. मार्केटचा अभ्यास करून विकते तेच पिकविण्याचे तंत्र शेतकरी अवगत करू शकतील त्यामुळे शेतामध्ये होणारी पिकांची नासाडी थांबेल. शेतीपासून दूर जात असलेल्या तरुण वर्ग शेतीकडे वळविण्यासाठी देखील मदत होईल. ड्रोन मुळे कीड, रोगाचे सर्वेक्षण, व्यवस्थापन करणे शक्य होईल. मोठ्या जमीन क्षेत्रासाठी डिजिटल शेती तंत्रज्ञान किफायतशीर आहे. परंतु, छोट्या जमीन धारणाक्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हानदेखील आहे. शेतकरी स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित तंत्रज्ञान पोचविण्यासाठी विविध प्रकारचे अॅप विकसित करावे लागतील.  डॉ. ढवण म्हणाले, एकीकडे कुपोषण तर दुसरीकडे शेतमालाची नासाडी या समस्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी आहे. डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. खोडके यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यी, प्राध्यापक सहभागी झाले आहेत. अंतराळ शेतीवर संशोधन सुरू अविनाश शिरोडे म्हणाले, की येत्या काळात वाढती लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वीवरील संसाधने अपुरी पडू शकतात. सूर्यमालेतील बहुतांश संसाधने अंतराळात आहेत. पृथ्वीवर हवामान बदलामुळे शेती व्यवसायासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे अमेरिका, भारत,चीन, जपान आदी देश अंतराळ शेती (स्पेस फार्मिंग) वर संशोधन करत आहेत. अंतराळ संशोधन केंद्रामध्ये सोयाबीन, झुकीनी आदी पिकांवर संशोधन केले जात आहे. येत्या काळात मंगळ ग्रह तसेच चंद्रावर शेती करण्याच्यादृष्टीने नासा तर्फे मिशन राबविण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठांनीदेखील अंतराळ शेती संशोधनासाठी अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com