शेतकरी संघटनेची आजपासून तंत्रज्ञान प्रचार यात्रा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला   ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सरकारने जी. एम. बियाण्यांवर असलेली बंदी उठवावी यासाठी अकोला जिल्ह्यात १० जून रोजी प्रतिबंधित बियाण्यांची लागवड करून जाहीर आंदोलन केले जाणार आहे. त्याच्या प्रचारानिमित्त शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने आजपासून (ता. १ जून) तंत्रज्ञान प्रचार यात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

यासंदर्भात श्री. घनवट म्हणाले, की जगभरात अनेक पिकांमध्ये संशोधन करून जनुकीय सुधारित (जीएम) वाण विकसित झाले आहेत. मात्र भारतात बीट, कपाशी व्यतिरिक्त बियाण्यांना बंदी आहे. कॉंग्रेस राजवटीपासून असलेली ही बंदी भाजपाच्या राजवटीतसुद्धा कायम आहे. संमत नसलेले जीएम बियाणे बाळगणे, विकणे, चाचणी घेणे किंवा शेतात पीक घेणे हा गुन्हा असून त्यास एक लाख रुपये दंड व पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. असा कायदा करणे हा शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्यावर घाला आहे.२००१ मध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर कपाशीच्या बीजी १ व बीजी २ या बियाण्यांना परवानगी मिळाली. त्यापुढील तंत्रज्ञान आज बाजारात उपलब्ध आहे. तणनाशकरोधक कपाशीचे बियाणे भारतात चोरुन लावले जात आहे. हे बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा खुरपणीचा खर्च वाचणार आहे. बोंड अळीप्रमाणेच वांग्यावर पडणाऱ्या फळ पोखरणाऱ्या अळीला प्रतिकार करणारे बियाणे तयार आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होत असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. भारतात मात्र या वाणास बंदी आहे. 

याविरोधात जागृती करण्यासाठी तंत्रज्ञान प्रचार यात्रेस प्रारंभ करण्यात येत आहे. शनिवारी (ता. १) धुळे येथून या यात्रेस प्रारंभ होत असून जळगाव, बुलडाणा, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती व अकोला या जिल्ह्यातून ही प्रचार यात्रा जाईल. १० जून रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात तंत्रज्ञान भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी प्रतिबंधीत कपाशी व वांग्याच्या बियाण्यांची लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाकारणारा हा कायदा आम्हाला मान्य नसून शेतकरी सविनय कायदे भंग आंदोलन होत आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. घनवट यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com