मे महिन्यात तापमान सामान्य राहणार

तापमान
तापमान

पुणे ः हिंदी महासागराच्या दक्षिणेला तयार झालेले लोरान चक्रीवादळ, त्यानंतर उत्तर भागात दुसरे फनी चक्रीवादळ तयार झाले होते. या वादळाचा परिणाम राज्यासह देशातील वातावरणावर झाला. वादळामुळे या भागातील तापमानात वाढ झाली. येत्या दोन दिवसांनंतर फनी चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे चालू मे महिन्यात तापमान हे सामान्य राहील, असे मत इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भारतातील `सध्याचे हवामानविषयक पैलू` या विषयावर गुरुवारी (ता. २) वार्तालाप पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. या वेळी पुणे श्रमिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संघाचे सरचिटणीस पांडुरंग सांडभोर आदी उपस्थित होते.  श्री. कुलकर्णी म्हणाले, की २५ ते ३० एप्रिल या कालावधीत संपूर्ण भारतात उष्णतेचा कहर होता. भारतीय हवामान विभागानुसार मार्च ते मे हा मॉन्सूनपूर्व ऋतू गणला जातो. फेब्रुवारीनंतर मार्चपासून कमाल तापमानात वाढ होते. सर्वात जास्त तापमान मध्य भारतावर म्हणजेच गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, ओडिशा या भूभागावर होते. त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या ठिकाणचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले होते.   देशातील तापमानवाढीसाठी प्रामुख्याने स्थिर घटक आणि बदलते घटक हे कारणीभूत असतात. स्थिर घटकांमध्ये सूर्याची उष्णता दिवसेंदिवस वाढत राहते. त्यामुळे जमीन तापून हवेचे तापमान वाढते. अरबी समुद्रावर जमिनीलगत जास्त हवेचे क्षेत्र निर्माण होते. त्याच्या भोवती फिरणारे चक्राकार वारे उत्तरेकडून भारताच्या मध्य भूभागावर येतात. ते येताना उत्तरेकडील उष्णता घेऊन येतात. त्यामुळे हवेचे तापमान वाढण्यास मदत होते. याशिवाय गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे जमीन जास्त तापली असल्याने हवेचे तापमान यावर्षी सरासरीपेक्षा १ ते ५ अंशाने जास्त होते. या सर्व स्थिर घटकांमुळे मध्य भारतावर नेहमीच जास्त होते. ही स्थिती साधारणपणे २४ एप्रिलपर्यत होती. त्यामुळे कमाल तापमान वाढले होते.  बदलत्या घटकांमध्ये २५ एप्रिलनंतर लोराना आणि फनी अशी दोन चक्रीवादळे तयार झाली होती. मात्र लोराना चक्रीवादळ २९ एप्रिलला शमले. त्यामुळे लगेच ३० व १ मेला तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. फनी चक्रीवादळ चार, पाच मेनंतर क्षीण होईल. त्यानंतर निर्माण झालेले हवेचे चलनवलन क्षीण होऊन मध्य भारतातवरील तापमान नेहमीप्रमाणे ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.  अल निनोच्या प्रभावाची तीव्रता सौम्य राहील  अल निनोचा जीवनकाळ दोन वर्षाचा असतो. काही वेळेस त्याचा परिणाम भारतासह जगातही होतो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या अल निनोकडे असते. पावसावर परिणाम करणारा एकमेव घटक असून तो पाऊस देत नाही. आपल्याकडील पाऊस हा अल निनोवर अवलंबून नसला तरी इतर गोष्टीवरही अवलंबून आहे. मार्च महिन्यात अल निनोची तीव्रता जास्त होती. मात्र, आता ती कमी होताना दिसत आहे. जूनमध्ये त्याची तीव्रता  ५०-५५ टक्क्यांपर्यत राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस सर्वसाधारण ९६ टक्के राहील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होरपळलेल्या बळिराजाला दिलासा मिळेल. मात्र, हा अंदाज देशाचा आहे. यानंतर सुधारित अंदाज लवकरच जाहीर केला जाईल.  

पावसाच्या खंडापूर्वी पूर्वतयारी करण्याची गरज  हवामान विभागाकडून दरवर्षी अंदाज दिला जातो. यामध्ये आठ दिवस, पंधरा दिवस, २१ दिवस आणि तीन महिने असा वेगवेगळा अंदाज दिला जातो. हा अंदाज सर्वत्र सारखा होईल अशी स्थिती नसते. शेतकऱ्यांसाठी मे महिन्यातील अंदाज महत्त्वाचा असतो. तो अंदाज वितरणाचा अंदाज असतो. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होता. मात्र, काही वेळेस एक दोन दिवसाचा खंड पडतो. तो शेतकऱ्यांना नुकसानकारक नसला तरी १० दिवसापेक्षा अधिक कालावधीचा पावसाचा खंड हा नुकसानकारक असतो. त्यासाठी कृत्रिम पावसासारखे बॅकअप प्लॅनिंगचे योग्य नियोजन (पूर्वतयारी) करण्याची गरज अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com