वडनेर, वाजेवाडीत बिबट्याची दहशत कायम

वडनेर, वाजेवाडीत बिबट्याची दहशत कायम
वडनेर, वाजेवाडीत बिबट्याची दहशत कायम

नगर : पारनेर तालुक्‍यातील वडनेर, वाजेवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. या भागात आतापर्यंत अनेक जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. शिवाय दोन बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन मृत्यूही झाले आहेत. मागणी करूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने त्याची दहशत कायम आहे. शेतकरी, नागरिक हतबल झाले आहेत. 

बिबट्या सोमवारी (ता. ५) रात्री वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडीत दिसला. त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली. नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याने दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी शिरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दिग्विजय उचाळे हा शालेय विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला. वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडी परिसरात राधाबाई कारभारी वाजे (वय ६९) यांचा मृत्यू झाला होता. शिरापूर येथेही मेंढपाळाची मुलगी सानिका बरकडे हिला जीव गमवावा लागला. 

वडनेर बुद्रुक व वाजेवाडी शिवारात गेल्या वर्षापासून पाच बिबट्यांचे वास्तव्य आहे, असे नागरिक सांगतात. या भागात ग्रामस्थांच्या मागणीवरून दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, त्यांना पकडण्यासाठी वन विभागाने विशेष प्रयत्न केले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. ‘सकाळ’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही वन विभागाने दखल घेतली नसल्याची बाब समोर आली होती. 

‘दिवसा वीजपुरवठा करा’

येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून शेतीची कामे करीत आहेत. निघोज, वडनेर बुद्रुक, वाजेवाडी, शिरापूर हा कुकडी नदीकाठचा परिसर आहे. त्यामुळे उसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त आहे. परिणामी, बिबट्यांचा वावर आहे. या परिसरातील शेतीपंपांना दिवसा वीज द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वडनेर बुद्रुक व वाजेवाडी ग्रामस्थांनी महावितरणला दिला होता. मात्र, वीजपुरवठ्यात बदल झाला नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com