बहुमत चाचणीत ठाकरे सरकार उत्तीर्ण

Thackeray government passes in majority test
Thackeray government passes in majority test

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर विधिमंडळात शनिवारी (ता. ३०) अखेर शिक्कामोर्तब झाले. बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार तब्बल १६९ मतांनी उत्तीर्ण झाले, तर विरोधात शून्य मतदान झाले. चार सदस्य तटस्थ राहिले. बहुमत चाचणीवेळी भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

दरम्यान, त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचे ठासून सांगितले. यादरम्यान भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन मोठा गोंधळ घातला आणि त्यानंतर सभात्याग केला. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. दुपारी दोन वाजता कामकाजाला सुरुवात झाली. वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा हंगामी अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय झाला. तसेच मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. 

त्याआधी फडणवीस यांनी हे अधिवेशन बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘मागचे अधिवेशन राष्ट्रगीताने संपले. त्यामुळे नव्या अधिवेशनासाठी राज्यपालांचा समन्स आवश्यक आहे. शिवाय मंत्र्यांचा शपथविधी अवैध आहे’’, असे फडणवीस म्हणाले. नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? तुमच्याकडे १७० चा आकडा आहे, तर मग भीती कसली? गुप्त मतदान झाले, तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे, असा आक्षेपही त्यांनी नोंदवला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बदलण्याची घटना कधीही घडलेली नाही, कोणत्या भीतीने हंगामी अध्यक्ष बदलले? असेही ते म्हणाले. 

याला उत्तर देताना अध्यक्ष वळसे पाटील म्हणाले, ‘‘एक तर सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेबद्दल मी काही बोलणार नाही. दुसरे म्हणजे हंगामी अध्यक्ष निवडीचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाला आहे. मंत्रिमंडळाने ही निवड राज्यपालांकडे पाठवली. ती मंजूर करून राज्यपालांनी माझी निवड केली. त्यामुळे ही निवडसुद्धा कायदेशीर असल्याचे स्पष्ट करून त्यांनी फडणवीस यांच्या दाव्यातील हवा काढली.’’  

समन्स काढण्याबाबत वळसे पाटील म्हणाले, ‘‘या सभागृहात अधिवेशन बोलविले. ते संस्थगित झाले. सात दिवसांच्या आत सभागृह बोलवता येते. त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा बैठक झाली. शुक्रवारी (ता. २९) राज्यपालांनी अधिवेशनाला परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे.’’ यानंतर भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरून गोंधळ सुरू केला. ‘दादागिरी नहीं चलेगी’ यांसारख्या घोषणा देत त्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला. 

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी बहुमताचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. यानंतर हेड काउंटद्वारे मतमोजणी करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून संख्याबळ १७० इतके होते. त्यापैकी १६९ मते महाविकास आघाडी अर्थात ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज (ता. १) विधानसभा कामकाज होणार असून, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल. तसेच विरोधी पक्षनेत्यांची नियुक्तीही केली जाईल. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपतर्फे आमदार किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. 

छगन भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यपालांची शपथ जशीच्या तशी वाचली. शपथ घेताना संसदेत पण जय श्रीराम आणि अशा घोषणा केल्या जातात. मग संसद रद्द करावी लागेल. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. ते म्हणाले होते, मजबूत विरोधी पक्ष हवा, आम्ही त्यांना दिला आहे’’

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला पाहिजे होते. प्रचाराच्या काळात फडणवीस म्हणायचे, मला विरोधी पक्षनेता दिसत नाही. त्या वेळी मी तेव्हा म्हटले होते की, तुम्ही आरशात उभे राहा. तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल.’’

महापुरुषांचा भाजपला राग का ः जयंत पाटील

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी निवेदन केले. त्यांनी फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. फडणवीस यांनी शिस्त पाळायला हवी होती. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते, असेही पाटील म्हणाले.

आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा उल्लेख केला, तेव्हा फडणवीस आणि भाजपच्या सदस्यांना कशाचा राग आला, असा सवालही त्यांनी विचारला. विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

मी समोरासमोर लढणारा ः मुख्यमंत्री 

माझ्यावर मंत्रिमंडळाने आणि सभागृहाने जो विश्वास व्यक्त केला, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर जनतेचेदेखील आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथे येताना दडपण होते, कारण इथे कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपले पहिले भाषण केले. बाळासाहेबांमुळे आम्ही आलो, त्यांना वंदन केल्याशिवाय आम्ही कोणतेही कामकाज करत नाही. त्यामुळे माझ्या आई-वडिलांची पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात शपथ घेईन, असेही ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले, ‘‘मी मैदानातला माणूस आहे. सभागृहात कसे होईल याची मला चिंता होती. पण इथे आल्यावर कळले मैदानातच चांगले असते.’’ या वेळी त्यांनी भाजपने घातलेल्या गोंधळावर टीका केली. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरदेखील घेणार आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com