साखर कारखान्यांवर जादा व्याज नको : साखर आयुक्त 

साखर परिषद, पुणे
साखर परिषद, पुणे

पुणे : ''राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देताना बॅंकांकडून जादा व्याज आकारले जात आहे. मुळात कर्जापोटी कारखाने आपली साखर तारण ठेवतात. कारखान्यांचा कर्ज पुरवठा सुरक्षित असूनही व्याजदर जादा ठेवणे संयुक्तिक नाही. बॅंकांनी या धोरणाचा फेरविचार करावा,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. 

राज्य सहकारी बॅंकेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय साखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता.५) उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त सतीश सोनी, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळ सदस्य अविनाश महागावकर व संजय भेडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, व्यवस्थापकीय संचालक अजित देशपांडे, पुणे मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यावेळी उपस्थित होते. परिषदेत आज (ता.6) सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साखर उद्योगावरील मंथनाला सुरुवात होईल. 

“साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत चालू हंगामातील ९७ टक्के एफआरपी दिली आहे,” असे स्पष्ट करीत साखर आयुक्त म्हणाले की, “आगामी हंगामात मात्र ऊस उत्पादन घटू शकते. त्यामुळे काही कारखाने सुरू देखील होणार नाहीत. अशा स्थितीत कारखानदारीसाठी हा हंगाम एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकतो.”

सहकार आयुक्त सोनी म्हणाले की, “ राज्य बॅंकेच्या एकूण कर्ज पुरवठ्यात ग्राहक म्हणून ५० टक्क्यांहून अधिक वाटा साखर कारखान्यांचा आहे. त्यामुळे कारखान्यांच्या बळकटीकरणासाठी बॅकेने परिषद आयोजित करण्याचा निर्णय स्तुत्य ठरतो.”

“कारखानदारी मजबूत करण्यासाठी बॅंक व कारखाने एकत्र आले पाहिजे, असा आग्रह धरत श्री.अनास्कर यांनी ‘एनपीए’च्या समस्यांबाबत आपली मते स्पष्टपणे मांडली. “कर्जदारांची मालमत्ता विकून एनपीएची वसुली करणे हे बॅंकेच्या मूळ तत्त्वांशी विसंगत आहे. खरे तर कर्जदाराची परतफेडीची क्षमता वाढवून कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. तोच धागा पकडून आमचे कर्जदार असलेल्या कारखान्यांना सक्षम होण्यासाठी साखर परिषदेचे आयोजन केले आहे,” असे ते म्हणाले. प्रदर्शनात मिळते प्रक्रिया प्रकल्पांची माहिती  साखर उद्योगातील विविध प्रक्रियेसाठी बाजारात उपलब्ध असलेली यंत्र सामग्री व आधुनिक प्रणालीची माहिती देण्याचा प्रयत्न प्रदर्शनातून केला गेला आहे. प्रदर्शनात इथेनॉल व  अल्कोहोल उत्पादन प्रकल्प तसेच साखर कारखाना उभारणीपासून ते ऊस तोडणीसाठी अत्यावश्यक असलेली यंत्रे मांडण्यात आली आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com