मराठवाड्यात सव्वीस तालुक्‍यांत अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस नाही

सव्वीस तालुक्‍यांत अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस नाही
सव्वीस तालुक्‍यांत अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस नाही

औरंगाबाद : दोन दिवस बहुतांश भागांत पावसाची कृपा झाली असली, तरी मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांपैकी तब्बल २६ तालुक्‍यांत अजूनही अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व वैजापूर तालुक्‍याचा अपवाद वगळता एकाही तालुक्‍यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यातील पावसाच्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्‍यासह परभणी जिल्ह्यातील पाच, हिंगोलीमधील तीन, नांदेडमधील सहा, बीडमधील पाच, लातूरमधील तीन व उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्‍यांत २१ जुलैअखेरपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यात अपेक्षेच्या २७.७ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्‍यात २८.८ टक्‍केच पाऊस झाला होता. ६ ते २१ जुलैदरम्यान मराठवाड्यातील बहुतांश मंडळात ३ ते ४ वेळाच दखल घेता येईल असा पाऊस झाला. २० व २१ जुलै यादरम्यान झालेल्या पावसाने आजवर नगण्य पाऊस झालेल्या मंडळांमधील एकूण पावसाची आकडेवारी सुधारण्यास मदत केली. परंतु, अजूनही अनेक मंडळांत पडलेल्या पावसाची गोळाबेरीज १०० मिलिमीटरही पाऊस झाला नसल्याचे आकडे सांगतात. औरंगाबाद जिल्ह्यातील विहामांडवा मंडळात २० जुलैपर्यंत ३६ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला होता. २१ जुलैअखेरपर्यंत १४ मिलिमीटर झालेला पाऊस या मंडळात आजवर सर्वाधिक पाऊस ठरला. या मंडळातील विहामांडवासह चिंचाळा, टाकळी अंबड, इंदेगाव, केकतजळगाव, चोंढाळा, आवडे उंचेगाव, हिगणी, मिरखेडा, हिरडपुरी, नवगावात अजूनही जमीन काळीच आहे. पेरणी झाली नाही, ज्यांनी पाणी येईल या आशेने लागवड केली त्याची उगवणच झाली नसल्याची स्थिती आहे. नांदर मंडळातील खंडाळा, सालवडगाव, ब्रह्मगाव, कुतुबखेडा आदी गावांत अजूनही जमिनी काळ्याच दिसत असल्याची स्थिती आहे. पाऊस पडल्यानंतर काही भागांत नदी-नाले एक होत असल्याची स्थिती दिसत असली; तरी पावसाची असमान अवकृपा कायम असल्याने चिंता कायम आहे. 

५० टक्‍केही पाऊस न झालेले तालुके (२१ जुलैअखेर) पैठण, घनसावंगी, परभणी, पालम, पाथरी, सेलू, जिंतूर, हिंगोली, सेनगाव, वसमत, लोहा, किनवट, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, धर्माबाद, गेवराई, शिरूरकासार, अंबाजोगाई, वडवणी, धारूर, लातूर, औसा, चाकूर, उस्मानाबाद, परंडा. 

८५ मंडळांत १०० मिलिमीटरही पाऊस नाही मराठवाड्यातील एकूण ४२१ महसूल मंडळांपैकी ८५ मंडळांत अजून जेमतेम १०० मिलिमीटरही पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी ७, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ९, परभणी व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी १०, नांदेडमधील ६ व बीड जिल्ह्यातील सर्वाधिक २७ मंडळांचा समावेश आहे. या मंडळांमधील काही मंडळांची स्थिती प्रचंड बिकट असून, ५० मिलिमीटरही पाऊस पडला नसल्याची स्थिती आहे.

आमच्या गावासह जवळच्या नांदर मंडळातील गावशिवारात अजूनही ढेकळे फुटली नसल्याची स्थिती आहे. विहामांडवा मंडळात आजवरच्या पडलेल्या पावसात १४ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक आहे. तर, आजवर एकूण ५० मिलिमीटरच पाऊस पडला.  - बळिराम होटकर,  शेतकरी, विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com