पूर्वहंगामी कापसाचे मोठे क्षेत्र होणार रिकामे

पूर्वहंगामी कापसाचे मोठे क्षेत्र होणार रिकामे
पूर्वहंगामी कापसाचे मोठे क्षेत्र होणार रिकामे

जळगाव : खानदेश व लगतच्या भागात पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीची भीती आहे. खरिपात अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने चाऱ्यासह धान्याला पुढे बऱ्यापैकी दर असतील, असे चित्र आहे. परिणामी शेतकरी कापसाचे पीक काढून त्यावर ज्वारी, दादर, बाजरीची पेरणी करीत आहेत.

खानदेशात यंदा २५ मे नंतर पूर्वहंगामी कापसाची लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव भागात, धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा व नंदुरबारात अधिक झाली. खानदेशात एकूण सुमारे दीड लाख हेक्‍टरवर या कापसाची लागवड झाली.

पहिल्या चार ते पाच वेचण्या गुलाबी बोंड अळी रहीत झाल्या. दिवाळीपर्यंत अनेक शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र या महिन्यात अनेक ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. सद्यःस्थितीत तो ६० ते ६५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी पाहणी करून गुलाबी बोंड अळीसंबंधी पुष्टी दिली.

 पिकाचे नुकसान निश्‍चित आहे. पाणी, वेळ वाया घालविण्याऐवजी शेतकरी पीक काढून ते जाळत आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबारात सुमारे ६० ते ७० हजार हेक्‍टरवरील पूर्वहंगामी कापसाखालील पीक काढून क्षेत्र रिकामे झाल्याचा अंदाज शेतकरी, जाणकारांनी व्यक्त केला. त्यावर चारा व धान्य देणाऱ्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्यांच्याकडे कृत्रीम जलसाठे मुबलक आहेत, ते गव्हाची, तर जलसाठा कमी असलेले शेतकरी ज्वारी, बाजरीच्या पेरणीला पसंती देत आहेत.

सध्या ज्वारीला बाजारात २२०० रुपये प्रतिक्विंटलचा, तर दादरला (मालदांडी) २६०० रुपयांचा दर आहे. बाजरीचे दरही सध्या २००० रुपयांवर आहेत. तिचा चारा पशुधनासाठी सकस मानला जातो. पुढे चाराटंचाई अधिक राहील. ज्वारीचा चारा ४ हजार रुपये शेकडा, तर दादरचा किमान ५ हजार रुपये शेकडा या दरात मिळेल, असे सांगितले जात आहे. चाऱ्यामध्येच चांगले पैसे मिळतील व पिकांची फेरपालट होऊन चांगले बेवडही मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचा ज्वारी पेरणीकडे कल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com