नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
बातम्या
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाही
गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पावसाचे परिणाम दिसू लागले आहेत. यंदाची परिस्थिती पाहता चारा टंचाई भासणार नसल्याने पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पावसाचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या चार वर्षांत चाऱ्याच्या गंभीर टंचाईला तोंड द्यावे लागले होते. यंदाची परिस्थिती पाहता चारा टंचाई भासणार नसल्याने पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुके कायम दुष्काळी आहे. दुष्काळ पाचवीला पुजलेला. प्रामुख्याने या तिन्हीही तालुक्यांत पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या भागात संपूर्ण शेती पावसावर आधारित आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांत या भागात मॉन्सून, परतीचा पाऊस अपेक्षित झाला नाही. त्यामुळे या भागात दरवर्षी चारा टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या दोन वर्षांपूर्वी जत, आटपाडी, आणि कवठेमहांकाळ तालुक्यात चारा छावण्या सुरू केल्या होत्या. यामाध्यमातून चारा टंचाईचा प्रश्न सोडवला होता. परंतु इथल्या पशुपालकांना दरवर्षी चारा खरेदी करावा लागत असल्याने आर्थिक ताळमेळ घालणे मुश्कील झाले होते. अशा परिस्थितीत सुद्धा दुष्काळी पट्ट्यात जनावरांची संख्या वाढली असल्याचे दिसते आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. एकाबाजूला फळ पिकांचे नुकसान देखील झाले. तसेच खरीप हंगामातील पिकांना पावसाचा काही प्रमाणात फटका बसला. या पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातील तलाव, ओढे, नाले, बंधारे तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पाणी टंचाई
भासणार नाही. तसेच खरीप हंगातील ज्वारी, मका या पिकासह अन्य पिकांचा चारा शेतकऱ्यांच्याकडे पुरेसा शिल्लक आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मका पिकासह अन्य पिकांची पेरणी केली आहे. पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळी पट्ट्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
जतच्या पूर्व भागात भासेल टंचाई
जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्यावर्षी काही ठिकाणी पाऊसच झाला नाही. त्यामुळे सोन्याळ, उटगी, जाडरबोबल, निगडी बुद्रुक या भागात काही प्रमाणात चारा टंचाई भासेल. परंतू परिसरात चारा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना इतर कोणत्याही ठिकाणाहून चारा विकत आणावा लागणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- 1 of 1538
- ››