खानदेशाची तहान २५८ टॅंकरवर

खानदेशाची तहान २५८ टॅंकरवर
खानदेशाची तहान २५८ टॅंकरवर

जळगाव : खानदेशात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत मागील चार दिवसांत टॅंकरची संख्या पाचने वाढून ती २५८ पर्यंत पोचली आहे. जळगाव जिल्ह्यात १३८ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. गिरणा व हतनूर धरणांतून पिण्याच्या पाण्यासाठी नदीमध्ये आवर्तन सोडावे, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी आहे. 

सध्या जळगाव जिल्ह्यात १५१ गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील१५३ गावांमध्ये टंचाईस्थिती गंभीर आहे. टॅंकरचे प्रस्ताव मागील आठवड्यात वाढले असून, सुमारे २५ नवे प्रस्ताव जळगाव जिल्हा प्रशासनाकडे आले. जळगावात २४४ गावांना २४७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ४७ गावांना ४५ ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. ५५ गावांना ९९ विहिरी मंजूर आहेत. ४० गावांना ५५ नवीन कूपनलिका सुरू केल्या आहेत. ५१ गावांमध्ये विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत, असा दावा  प्रशासनाने केला. 

नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतही टॅंकरचे प्रस्ताव वाढत आहेत. चाळीसगाव तालुक्‍यात ३२, अमळनेरात २७ टॅंकर सुरू आहेत. मागील १८-२० दिवसांत टॅंकरची संख्या जळगाव जिल्ह्यात ५५ ने वाढली आहे. धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, चोपडामध्ये पाणीटंचाई तीव्र नाही. त्यामुळे टॅंकरची गरज या भागात नाही. नंदुरबार तालुक्‍यात ४१ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. धुळ्यात साक्री, धुळे, शिंदखेड्यात ६० टॅंकर सुरू आहेत. दोंडाईचा (जि. धुळे) येथील रामदेवजी बाबा भक्त परिवाराकडून टॅंकर भेट देण्यात आले. 

शिवार उजाड होण्याची भीती पाणीटंचाई दूर होण्यासाठी गिरणा धरणातून चौथे आवर्तन केव्हा सुटेल, याची शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. धरणातून तीन वेळेस आवर्तने सुटली आहेत. चौथ्या आवर्तनाची मागणी मागील १० - १२ दिवसांपासून सुरू आहे. गिरणा नदीकाठी लिंबू, कांदा, केळी, भाजीपाला पिकांची शेती आहे. कूपनलिकांची पाणीपातळी खालावली असून, शिवार उजाड होण्याची भीती ग्रामस्थ, शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com