मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी बॅंकांचा दुष्काळात तेरावा महिना

मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी बॅंकांचा दुष्काळात तेरावा महिना
मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी बॅंकांचा दुष्काळात तेरावा महिना

औरंगाबाद : लांबलेला, असमान पाऊस, पेरलेल्या पिकांवर कीडरोगांच्या आक्रमणामुळे अजूनही दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सहन कराव्या लागत आहेत. अशातच जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकां पीक कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टपूर्तीपासून दूरच आहेत. जुलै संपलातरी मराठवाड्यात कर्जपुरवठ्याची केवळ २४.३२ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती झाली असून, दुष्काळात बॅंकांचा तेरावा महिना आल्याची स्थिती आहे. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील व्यापारी, जिल्हा सहकारी व ग्रामीण बॅंकांना ११ हजार ३१८ कोटी ६६ लाख ४४ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्षांक देण्यात आला. त्यापैकी बॅंकांनी सोमवार (ता. २९) अखेरपर्यंत केवळ २४.३२ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती केली. त्याद्वारे केवळ ५ लाख १४ हजार ६५ शेतकऱ्यांना २७५२ कोटी ६१ लाख ५३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले.

 व्यापारी बॅंकांनी ७६७२ कोटी ७९ लाख ९८ हजार रुपयांपैकी ९९ हजार ४८८ शेतकऱ्यांना ११०८ कोटी १ लाख ३५ हजार रुपयांचे कर्जवाटप करून १४.४४ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती केली. ग्रामीण बॅंकेने १५७६ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपयांपैकी २४.१९ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली. त्याद्वारे ४७ हजार ५ शेतकऱ्यांना ३८१ कोटी ३५ लाख ९८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २०६९ कोटी ७ लाख ६३ हजार रुपयांपैकी ६१.५ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली. त्याद्वारे ३ लाख ६७ हजार ५७२ शेतकऱ्यांना १२६३ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कृषिमंत्र्यांनी औरंगाबाद येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी व आयुक्‍तांना प्राधान्याने पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही बॅंकां उदासीनच असल्याचे समोर आले. त्यावरून शासन आणि प्रशासनाचा बॅंकावर धाक उरला नसल्याचे चित्र समोर आले आहे.

 जिल्हानिहाय कर्जपुरवठा

जिल्हा  उद्दिष्ट   पूर्ती
औरंगाबाद  १२३२ कोटी १ लाख  ४०७ कोटी ३७ लाख 
जालना १०४६ कोटी ९१ लाख  २४४ कोटी ६७ लाख ६७ हजार
परभणी  १४७० कोटी ४४ लाख २३ हजार १८२ कोटी २९ लाख ५२ हजार 
हिंगोली ११६१ कोटी ९६ लाख ७७ हजार १०८ कोटी ३७ लाख ९८ हजार 
लातूर   १८९९ कोटी २७ लाख   ९३७ कोटी १ लाख २२ हजार 
उस्मानाबाद १५९० कोटी ५५ लाख ४७ हजार ३३८ कोटी ९२ लाख
बीड   ९५० कोटी    १८४ कोटी ७५ लाख ९२ हजार
नांदेड   १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार   ३४९ कोटी १९ लाख ७२ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com