नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
बातम्या
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी
गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांच्या काळात जिल्हा मार्केटींग फेडरेशन अंतर्गत असलेल्या ६१ खरेदी केंद्रांवर सुमारे ३५ कोटी ३७ लाख रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.
गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर धानाची आवक वाढीस लागली आहे. गेल्या आठ दिवसांच्या काळात जिल्हा मार्केटींग फेडरेशन अंतर्गत असलेल्या ६१ खरेदी केंद्रांवर सुमारे ३५ कोटी ३७ लाख रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्यापही ९ धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी मात्र कायम आहेत.
हलके धान कापणीस आल्याने त्याच्या विक्रीकरिता दिवाळीपूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्याची दखल घेत काही भागात धान खरेदी केंद्र सुरूही करण्यात आले. परंतु आता दिवाळीनंतर जिल्ह्यातील ६१ केंद्रांवर धान आवक वाढल्याची नोंद आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात ७० खरेदी केंद्र प्रस्तावीत केले होते. त्यातील ९ केंद्र अद्यापही सुरु करण्यात आली नाहीत.
दरम्यान शासनाने यंदा धानाला १८६८ ते १८८८ रुपयांचा हमीभाव दिला आहे. त्यासोबतच गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील ७०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे धानाचे दर २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचल्याने हमीभावानेच धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. परिणामी जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या केंद्रावर आतापर्यंत १ लाख ३७ हजार क्विंटल धानाची आवक झाली. मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची किंमत ३५ कोटी ३७ लाख रुपये आहे. आदिवासी विकास महामंडळाने २२ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाची ४४ केंद्र प्रस्तावीत असली तरी त्यातील केवळ तेराच सुरु झाली आहेत. उर्वरित २४ केंद्रांची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच आहे. ही केंद्र सुरु झाल्यास बऱ्याच अंशी दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात वाढणार हमीभाव केंद्र
शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकरिता जिल्हयात मोठ्या संख्येने धान केंद्रांना मंजुरी देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी ३० ते ३५ केंद्रांची भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच या संदर्भातील मंजुरी देणार असल्याचे सांगण्यात आले.
- 1 of 1496
- ››