सोलापूर जिल्ह्यात चौतीस हजार लशी आल्या

सोलापूर: जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० हजार १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. सोलापूरसाठी ३४ हजार डोसेस उपलब्ध झाल्या आहेत.
 Thirty four thousand vaccines were received in Solapur district
Thirty four thousand vaccines were received in Solapur district

सोलापूर: ‘‘ जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० हजार १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल.  सोलापूरसाठी ३४ हजार डोसेस उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली आहे,’’ असे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी येथे सांगितले.

पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १६ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी ग्रामीण भागात बारा, तर सोलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र असतील. प्रत्येक तालुक्यात एक, तर माळशिरस तालुक्यात दोन केंद्रे असतील. लसीकरणाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. ५९९ लसटोचक नियुक्त करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचे पथक असणार आहेत. एक निरीक्षक आणि एक ऍडव्हर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.’’ 

‘‘जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविडशिल्ड लस मिळणार आहे. या लस जिल्हा लस भांडार येथे साठविण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालय परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे’’, असे त्यांनी सांगितले.

‘बर्ड फ्लू’ला घाबरू नका

जिल्ह्यामध्ये ‘बर्ड फ्लू’बाबत जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पक्षामध्ये ‘बर्ड फ्लू’ सदृश्य लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, कोणत्याही प्रकारचा पक्षी मृत झाल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com