रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के भात कापणीला फटका

रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंतिम टप्प्यातील तीस टक्के भात कापणीला फटका बसला आहे.
 Thirty percent of rains in Ratnagiri district hit paddy harvest
Thirty percent of rains in Ratnagiri district hit paddy harvest

रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंतिम टप्प्यातील तीस टक्के भात कापणीला फटका बसला आहे. सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे दिवसभराच्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. खेडमध्ये वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला. लांजा येथे बैलाच्या अंगावर वीज पडली.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाचा आलेल्या दिवाळी सणात जोरदार पावसाने गोंधळ घातला आहे. हवामान विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली असून चार दिवसांपूर्वी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मागील चार दिवस अधूनमधून पावसाची हजेरी ठरलेलीच आहे. दिवाळीला सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गुरुवारी (ता. ४) दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरीसह लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. चिपळूणात तासभर कोसळलेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

रत्नागिरीतही तिच परिस्थिती होती. शनिवारी सायंकाळी चार वाजता पावसाने हजेरी लावली. भाऊबिजेचा सण असल्यामुळे बाजारपेठेतील वातावरण शांत होते. चिपळूणात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे भात कापणी करणार्‍या बळिराजाला त्याचा फटका बसला. कापणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेले भातही भिजले. तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळीपूर्व भात कापणीला सुरुवात झाली. कापलेल्या भाताची उडवी रचलेली आहे.

दिवाळी संपल्यानंतर भात झोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पाऊस पडल्यानंतर कापलेल्या भातावर पाणी पडले आहे. वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला.  चिपळूण शहरासह सावर्डे, अलोरे, पोफळी, खेर्डी, शिरगाव, मार्गताम्हाने, पेढांबे, दसपटी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरपैकी सुमारे २० हजारहून अधिक हेक्टरवरील भात कापणी शिल्लक आहे. दिवाळीमध्ये पडणार्‍या या पावसामुळे उभी भात आडवी झाली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com