रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे नुकसान

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरासह दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चिपळूण आणि खेड तालुक्यांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Thousands of crores of rupees lost due to heavy rains in Ratnagiri
Thousands of crores of rupees lost due to heavy rains in Ratnagiri

रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरासह दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चिपळूण आणि खेड तालुक्यांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत २५ हजार मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

वशिष्टीच्या पुरामुळे चिपळूण शहर दोन दिवस, तर जगबुडीच्या पुरात खेड शहर पाण्याखाली होते. प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली. बाधितांना मदत करण्यासाठी हजारो लोकांनी हात पुढे केले होते. गेल्या आठ दिवसांत महसूल विभागाची सर्व यंत्रणा पंचनाम्यांसाठी लावण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूण शहराला मोठा तडाखा बसला आहे. चिपळूण शहरातील ९ हजार २७३ घरांचे, तर ४ हजार ३५९ व्यापाऱ्यांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. दोन्ही शहरांबरोबरच संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा तालुक्यातही पूर परिस्थिती होती. पूर्णतः १०६ घरे, अंशतः २ हजार ८१४ घरे, ६७ झोपड्या आणि ३६६ गोठ्यांचा समावेश आहे. चिपळूण तालुक्यातील ०.१० हेक्टरवरील मत्स्य शेतीला पुराचा फटका बसला आहे.

सरकारी मालमत्तेलाही फटका दरडी कोसळून आणि पुरामध्ये वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ३२ व्यक्ती या दोन शहरांतील आहेत. सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, जिल्हा परिषद मिळून २५ हजार मालमत्तांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे सुमारे ८० कोटींपेक्षा अधिक नुकसान आहे. पुरात महावितरणचे विद्युत खांब, वीजवाहिन्या यांच्यासह ट्रान्स्फॉर्मरचे मिळून ३ कोटी ४५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ११ कुक्कुटपालन शेडसह २१३ शेतकऱ्यांकडील ३ हजार २७४ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. सव्वातीनशे गाई-गुरांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण शहरातील दुचाकी, चारचाकी गाड्या वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. सुमारे ५ हजार वाहने बाधित झालेली आहेत. पावणेदोन हजार हेक्टरवरील भातशेती वाहून गेली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १० हजार ५७३ कुटुंबे पात्र ठरली आहेत.

पूर आणि दरडी कोसळून नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. बाधितांना सानुग्रह अनुदान वाटप केले जात आहे. - डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com