शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

अकोलाः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या पॅकेजमध्ये अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे.
Thousands of farmers in Akola, Buldana district await compensation
Thousands of farmers in Akola, Buldana district await compensation

अकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या पॅकेजमध्ये अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यावर आधारित मदतीचे वाटप होईल, अशी शक्यता आहे.

यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने पॅकेजची घोषणा केली. अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिपावसामुळे ५१ हजार ६४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला. ७० हजार ८४५ शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले. त्यासाठी ३७ कोटी पेक्षा अधिक निधीची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

यंदा सुरवातीपासूनच पावसाचा जोर काही भागात अधिक राहिला. अतिपावसामुळे सोयाबीनवर खोडकिडा वाढला होता. मूग, उडदापाठोपाठ ज्वारीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिप्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीची बोंडे काळवंडली होती.

नुकसानाचा कृषी व महसूल यंत्रणांनी अहवाल तयार केला होता. यानुसार जून ते सप्टेंबर या काळात ८४० गावांतील ५१६४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ७० हजार ८४५ शेतकऱ्यांना ही झळ झेलावी लागली होती. या सर्व शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा लागली आहे. 

जून ते सप्टेंबर या काळात बुलडाणा जिल्ह्यात  ६४७१० शेतकऱ्यांचे ६१६८९ हेक्टरचे नुकसान झाले. ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात सातत्याने पाऊस झाला. परिणामी, सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात धूळधाण केली आहे. उर्वरित तालुक्यातही प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा अहवालात समावेश नाही. शासनाच्या नियमानुसार अहवाल दिलेले शेतकरी मदतीस पात्र ठरू शकतात.

ऑक्टोबरमधील नुकसानाचे काय?

जिल्ह्यात या महिन्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. मात्र, या नुकसानाचे पंचनामे अद्यापही झाले नसल्याचे समजते. या महिन्यातील पावसामुळे ज्वारीच्या कणसांतून कोंब बाहेर आले आहेत. शिवाय पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले. मळणी केलेले सोयाबीन खराब झाली. या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी कुठला अहवाल ग्राह्य धरणार हा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com