रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र पुरामुळे बाधित

अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या पुरात लागवड केलेल्या भातशेती वाहून गेल्यामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
Thousands of hectares of paddy fields in Ratnagiri affected by floods
Thousands of hectares of paddy fields in Ratnagiri affected by floods

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या पुरात लागवड केलेल्या भातशेती वाहून गेल्यामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पंचनामे सुरू असून, अनेक ठिकाणी किनारी भागात पुराचे पाणी असल्यामुळे नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील जगबुडी, वाशिष्ठी, सोनवी, शास्त्री, बावनदी, काजळी आणि अर्जुना नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी किनारी भागातील गावांमध्ये शिरले होते. दहा फुटांपेक्षा अधिक पाणी पातळी होती. कोट्यावधीचे नुकसान झाले असून, यामध्ये भातशेतीलाही फटका बसला आहे. 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात लावणीची कामे पूर्ण झालेली होती. त्याचवेळी पूर आल्याने भातशेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी रोपे लावून दोनच दिवस झाले होते. पुराच्या पाण्याबरोबर माती, दगडांचा खच शेतात येऊन बसला आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी साचून राहिलेले आहे. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, फूटभर पाणी असल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. तरीही प्राथमिक अंदाजानुसार एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, टेंबे, सोमेश्‍वर, चिंचखरी या गावांतील भातशेतीचे नुकसान झाले आहे. चिंचखरी येथील बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतकरी हेमंत फाटक यांच्या शेतात खारे पाणी आले आहे. बंधाऱ्याचा सुमारे पंधरा फूट रुंदीचा भाग कोसळला झाले आहे. गेले तेरा दिवस त्यांची शेती पाण्याखाली राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. काजळी नदी किनारी असलेल्या पोंमेंडीतील शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण गाळ साचून राहिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चिपळूण ५३६ हेक्टर, संगमेश्‍वर ३०३ हेक्टर, राजापूर १०० हेक्टर, रत्नागिरी ६० हेक्टर, खेड ३२ हेक्टरचे नुकसान नोंदले गेले आहे. पंचनाम्याचा अहवाल दोन दिवसांनी प्राप्त होईल, असे सांगण्यात येत आहे.

पुरामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन हे काम सुरू आहे. - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com