हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चव

हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चव
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चव

नाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त रानभाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी, यासाठी रविवारी (ता. १३) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  सोशल नेटवर्किंग फोरम, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका, सापगाव, काचुर्ली, तळेगाव केंद्र, इंडियन मेडिकल असोसिएशनची नाशिक शाखा, मुद्रा मराठा महिला मंडळ, दिशा संकल्प फाउंडेशन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे नाशिक येथे महोत्सव झाला. रासायनिक खते आणि विषारी औषधीयुक्त भाज्यांच्या भडिमारामुळे जगभरातील लोकांना मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण-आदिवासी भागात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. हे महत्त्व शहरी लोकांना कळून आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे सेवन केलेल्या भाज्यांचा पुनर्वापर सुरू करण्यासाठी आदिवासी भगिनींनी रानातून गोळा केलेल्या जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियमयुक्त भाज्या, फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ या महोत्सवात मांडण्यात आले होते. आदिवासी पाड्यांवरील महिला या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. चाईचा मोह, मेका, कचरडा, जोथा, चिचचरडे, करटुले, लोथी यांसारख्या अनेक पौष्टिक भाज्या, त्यांची बनविण्याची पद्धत तसेच उपलब्धतेचे ठिकाण ही माहिती या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमने पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या उपक्रमाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. रानभाज्या नियमित विक्री केंद्र सुरू करण्याचा सोशल नेटवर्किंग फोरमचा प्रयत्न असल्याचे सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com