नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची हजारांकडे आगेकूच

नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची हजारांकडे आगेकूच
नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची हजारांकडे आगेकूच

येवला : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्या-वस्त्यांची संख्या वाढत्या उन्हाबरोबरच दिवसेंदिवस वाढत आहे. तहानलेली गावे-वस्त्यांनी सातशेचा आकडा पार केल्याने ही संख्या हजाराच्या दिशेने आगेकूच करत आहे. आजच १६९ गावे व ५४० वाड्यांना (एकूण ७०९)१८० टँकरने रोज ५०३ खेपा पाणीपुरवठा होत आहेत. माणशी २० लिटर याप्रमाणे तब्बल ४ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. अजून टंचाईचे दोन महिने जाणार असल्याने जिल्ह्यातील स्थितीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. 

यंदा पावसाने अवकृपा केल्याने भयावह स्थिती उद्भवली आहे. जिल्ह्यात आठ तालुके व १७ महसूल मंडळेदेखील दुष्काळी जाहीर केली आहेत. दिवसागणिक पाणीसाठा आटत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या वाढत आहे. अनेक गावांत टँकर न पोचल्यास पिण्यासाठी पाणीदेखील मिळत नसल्याचे चित्र आहे.

सद्यःस्थितीत टँकर भरण्यासाठी पाणी मिळविण्याची पंचायत झाल्याचे येवल्यासह अनेक ठिकाणी चित्र आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी येणाऱ्या काळात टँकर कुठून भरणार, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दिवसाला शासनाचे लाखो रुपये निव्वळ टँकरने पाणीपुरवठ्यासाठी खपत आहेत. त्यातही अनेक गावांतून लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रमाणात  पाणी मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तेथून टॅंकरच्या खेपा वाढविण्याची मागणी सुरू आहे. 

७ तालुके तहानलेले, तर ८ पाणीदार

सद्यःस्थितीत सिन्नर तालुक्याला टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. येथे एकूण टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या तब्बल २४३ आहे. यासाठी १११ खेपा रोज सुरू आहेत. त्या खालोखाल नांदगाव येथे १९६ गावे वाड्यांना ९५ टँकर, तर मालेगाव येथे १०५ गावे वाड्यांना शंभर टँकरने रोज पाणीपुरवठा सुरू आहे. बागलाण व येवल्याची स्थितीही चिंताजनक आहे. येथेही दिवसाला ८० टँकर खेपा सुरू आहेत.  बागायतदारांचे तालुके असलेले दिंडोरी, निफाड, नाशिक, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या आठ तालुक्यांत मात्र अद्याप पुरसे पाणी असल्याने टॅंकरची गरज भासली नसल्याचेही चित्र आहे.

टँकरचे आकडे बोलतात...

तालुका गावे वाड्या टँकर फेऱ्या
बागलाण ३५ २८  ८३
देवळा  १६  १५
चांदवड १० ६   २०
मालेगाव २५ ८० ३२ १००
नांदगाव  २२ १७४   ३१ ९५
सिन्नर   १९ २२४ ४४ १११
येवला  ५०  ३२ ३१  ७९
एकूण  १६९ ५४०  १८०  ५०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com