चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका 

देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग दूषित होऊ न देण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने ठोस पावले उचलावी लागतील. कारण, चिनी बियाणे दहशतवादाने सीमा ओलांडल्या आहेत.
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका 
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका 

पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग दूषित होऊ न देण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने ठोस पावले उचलावी लागतील. कारण, चिनी बियाणे दहशतवादाने सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर मुद्दा बियाणे उद्योगाने पुढे आणला आहे. 

भारतीय बियाणे संघटनेचे संचालक (एनएसएआय) इंद्रा शेखर सिंग यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले की, ‘‘भारतीय बियाणे कंपन्यांना चीनमध्ये मनाई आहे. मात्र, चीनी कंपन्या भारतात सर्व प्रकारचे संशोधन, शास्त्रीय चाचण्या, उत्पादन आणि व्यापारी कामे सर्रास करीत आहेत. या चीनी कंपन्या कोणत्या हे सर्वांना माहीत आहे. पण त्या भारतात नेमके काय करीत आहेत, भविष्यात बियाणे व्यवस्थेला कोणता धोका आहे, याचा आढावा तातडीने सरकारनेच घ्यायला हवा.’’ 

जागतिक बियाणे परीक्षण संघटनेने चीनी बियाणे दहशतवादाच्या अस्तित्वाचे संकेत दिले आहेत. ‘‘भारत सरकारला बियाणे क्षेत्रातील तस्करी संकटाबाबत जागृत करण्याचा निर्णय जागतिक बियाणे परीक्षण संघटनेने घेतला आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जागतिक बियाणे परीक्षण संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेत बियाण्यांबाबत काही धक्कादायक घडामोडी आढळून आल्या आहेत. अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये न मागविता देखील काही पाकिटे पाठविली जात आहेत. ऑनलाइन व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या या पाकिटांमध्ये अनोळखी बियाणे आढळत आहे. 

‘‘या पाकिटांमध्ये संशयास्पद बियाणे आढळल्याने अमेरिकेतील यंत्रणा सावध झाली. बियाण्यांचे स्त्रोत आधी सापडत नव्हते. मात्र, चौकशीअंती बियाण्यांचे मुळ चीनमध्ये असल्याचे आढळून आले आहे. हा बियाणे दहशतवादाचा प्रकार असल्याचा निष्कर्ष बियाणे उद्योगाने काढला आहे,’’ असे बियाणे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. 

बेकायदेशीर बियाण्यांपासून दूर राहावे व ती नष्ट करावीत, असा सल्ला अमेरिकेच्या कृषी विभागाने (जीएसडीए) दिला आहे. तसेच कॅनडाच्या अन्न तपासणी संस्थेने देखील तस्करीच्या बियाण्यांबाबत देशभर सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘‘बियाणे दहशतवादाची माहिती केंद्र शासनाला लवकरच दिली जाईल. देशातील यंत्रणा वेळीच सावध झाली नाही तर धोका वाढेल,’’ असे जागतिक बियाणे परीक्षण संघटनेच्या भारतातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील राज्य कृषी विभागांना पत्र पाठवून बियाण्यांच्या संशयास्पद पाकिटांबाबत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

प्रतिक्रिया माझ्या माहितीनुसार चीनी कंपन्या देशाच्या बियाणे उद्योगात नसून कीडनाशक उद्योगात आहेत. मात्र, बियाणे तस्करी आवाक्याबाहेर जात असल्याने एचटीबीटी बियाणे निर्मितीमधील मूळ विदेशी कंपन्यांच्या तंत्राला सरकारने आता मान्यता द्यायला हवी. सरकारी संशोधन संस्थांना ते तंत्रज्ञान उपलब्ध करून अधिकृत मार्गाने बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाईल.  - सी.डी. मायी, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com