कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलरसाठी तीन कोटी

ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी उपविभागातील प्रत्येक तालुक्‍याला निधी मिळाला असून प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती पत्रे देऊन निधीचे वितरण होईल. इतर अवजारांसाठीही निधी आला आहे. त्याच्या वाटपाचीही कार्यवाही सुरू होणार आहे. - डॉ. नंदकुमार कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज.
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलरसाठी तीन कोटी
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलरसाठी तीन कोटी

कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी जिल्ह्याला निधी मिळाला आहे. बारा तालुक्‍यांसाठी तीन कोटींचा निधी आला आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्‍यांसाठी सर्वाधिक प्रत्येकी ३३ लाख मिळाले आहेत. उर्वरित तालुक्‍यांसाठी २० ते २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून एकूण मागणीच्या २० टक्के लाभार्थींना लाभ देता येणार आहे. 

प्रतीक्षा यादीतील सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी अजूनही १२ ते १५ कोटींच्या निधीची गरज भासणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकारने समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत शेती अवजारांसाठी अनुदान देण्याची संकल्पना सुरू केली. लकी ड्रॉ पद्धतीने योजनेचे लाभार्थी निश्‍चित केले जातात. पहिल्या वर्षी मुबलक निधी मिळाल्याने योजनेला चांगला प्रतिसादही मिळाला. दुसऱ्या वर्षी ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलर वगळून इतर यंत्रांना निधी मिळाला. ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलर लाभार्थींची प्रतीक्षा यादी जैसे थे राहिली. 

मध्यंतरी केवळ अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी निधी आला. तोही अगदीच तोकडा आल्याने दोन ते तीन लाभार्थींनाच त्याचे वाटप झाले. गेले वर्षभर इतर लाभार्थींसाठी निधीच आला नव्हता.

निधीच नसल्याने ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी पूर्वसंमती देण्याची प्रक्रियाही कृषी विभागाने थांबविली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांचे डोळे निधी येण्याकडे लागले होते. चौकशी करून अखेर शेतकरी दमले; परंतु निधीचा मात्र पत्ता नव्हता. आता मार्च अखेर जवळ येऊ लागल्याने निधीचा ओघ सुरू झाला आहे. त्यातून कृषी यांत्रिकीकरणासाठीही जिल्ह्याला तीन कोटी मिळाले आहेत. हा निधी एकूण मागणीपैकी केवळ २० टक्केच आला आहे. गडहिंग्लज तालुक्‍याचे उदाहरण घेतले तर ट्रॅक्‍टर, पॉवर टिलरच्या लाभार्थी यादीत २१७ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

इतर अवजारांसाठी १० लाख

मळणी मशीन, रोटा व्हेटर, राईस मिल, डाळ मिल आदी इतर अवजारांसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्‍यांसाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी मिळाला आहे.  यापूर्वी या अवजारांसाठी गडहिंग्लजला २९ लाख, आजऱ्याला १९ लाख, भुदरगडला २६ लाख, तर चंदगड तालुक्‍याला ३० लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पूर्वसंमती दिलेल्या प्रतीक्षा यादीतील काही लाभार्थींना निधीचे वाटप केले आहे. उर्वरित निधीचेही पूर्वसंमती देऊन संबंधित लाभार्थींना वितरण होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com