तीन बाजार समित्यांत एकाच प्रतीच्या कांद्याला तीन वेगवेगळे दर !

Three different rates for the same quality onion
Three different rates for the same quality onion

येवला, जि. नाशिक : शेतकरी एकच, कांदाही तोच. मात्र, बाजार समिती बदलली की भावात प्रचंड तफावत आढळते, याचा अनुभव सायगाव येथील सोपान भालेराव या शेतकऱ्याने घेतला. त्यांनी विक्रीला नेलेल्या कांद्याला विंचूरला पाच हजार, लासलगावला तीन हजार ७०२, तर येवल्यात पाच हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल असा तीन प्रकारचा भाव दिल्याने व्यापारी हे शेतकऱ्यांची किती लूट करतात, याची प्रचीती आली.

शेतकऱ्याने शेतमाल पिकवूनही त्याचा भाव व्यापारी निश्‍चित करतो. या प्रक्रियेत शेतकऱ्याला कसे नाडले जाते, हे श्री. भालेराव यांनी समोर आणले आहे. आपल्या शेतातील काढलेला २० क्विंटल लाल कांदा त्यांनी गुरुवारी (ता. १९) विंचूर बाजार समितीत विक्रीला नेला असता, तेथे पाच हजारांचा भाव पुकारला, पण त्या दिवशी साडेआठ हजार रुपयांपर्यंतचे दर असल्याने त्यांनी आपल्या कांद्याला अजून भाव मिळेल, असा विश्‍वास बाळगत लासलगाव बाजार समितीत आपला ट्रॅकटर नेला. 

तिथे मुक्काम करून शुक्रवारी (ता. २०) त्यांनी लिलावात कांद्याचा ट्रॅक्‍टर उभा केला असता, तेथे व्यापाऱ्यांनी केवळ तीन हजार ७०२ रुपयांचा भाव पुकारला. मात्र, इतका कमी भाव ऐकून भालेराव संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी ट्रॅक्‍टर काढत तो येवला बाजार समितीत आणला. त्याचदिवशी दुपारच्या लिलावात येवला बाजार समितीत त्यांच्या कांद्याला पाच हजार ९५० रुपयांचा भाव पुकारला गेला. या भावाने समाधान झाल्याने त्यांनी कांदा विक्री केला. आपल्या उत्पादनावर विश्‍वास असल्याने त्यांनी भावावर अविश्वास दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केल्यामुळे त्यांचा सुमारे ४५ हजारांचा तोटा वाचला आहे.

दोन तासांत दुप्पट भाव असाच विचित्र अनुभव सायगाव येथील उद्धव दारुंटे यांना आला. अवघ्या दोन तासांत त्यांच्या कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याचा प्रकार घडला. त्यांनी २० डिसेंबरला विंचूर बाजार समितीमध्ये दहा क्विंटल कांदा रिक्षामधून विक्रीला नेला होता. सकाळी लिलावात त्यांचा कांदा दोन हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने पुकारला गेला. मात्र, या भावावर नाखूश होत त्यांनी तोच कांदा दुपारच्या लिलावात शेतकऱ्याचे नाव बदलून विक्रीसाठी ठेवला असता, त्यांना त्याच कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

निसर्गाने या वर्षी पिकांवर परिणाम केल्याने कांद्याचे उत्पादन घटले आहे. एकरात केवळ तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन मिळत आहे. बाजारभाव जरी जास्त दिसत असला, तरी उत्पादनखर्च जाता थोडाबहुत नफा पदरात पडत आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून अशी फसवणूक होत असेल तर शेतकऱ्यांच्या श्रमाला किती महत्त्व आहे, हे कळतेच. - सोपान भालेराव, शेतकरी, सायगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com