पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरित

पीकविमा योजना
पीकविमा योजना

मुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. विरोधकांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने थेट मुंबईतील एका विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नसला तरी कंपन्यांचा सुटल्याचे चित्र आहे. या आंदोलनानंतर लगेचच राज्य सरकारने पीक आणि फळ पीकविम्याची आपल्या हिश्याची सुमारे ३२५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. या योजनेतील त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना लागू झाली आहे. गेल्या काही वर्षांतील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. नैसर्गिक असमतोलामुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून पीक विमा योजना महत्त्वपूर्ण ठरली.  राज्यात गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात पाऊस कमी झाला. त्यातच परतीच्या पावसानेही आवश्‍यक तेवढी हजेरी लावली नाही. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि रब्बी पेरणीसाठी जमिनीत आवश्‍यक ओलावा नसल्याने १८-१९ च्या रब्बी हंगामात राज्यातील पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली.  राज्यातील रब्बीच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार १५९ हेक्टर इतके आहे. दुष्काळामुळे संपलेल्या रब्बी हंगामात त्यापैकी ३३ लाख ८१ हजार ९२९ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झालेली होती. दुष्काळात अथवा नैसर्गिक संकट काळात शेतकऱ्यांचा पीकविम्याकडे ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान २०१८-१९ मधील रब्बी हंगामातील पीकविम्याचा राज्य सरकारचा संपूर्ण हिस्सा ३७७ कोटी ७९ लाख आणि हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी २२७ कोटी ९ लाख रुपयांचा संपूर्ण हिस्सा इतका होतो. शासन निर्णयानुसार या दोन्ही योजनांचा उर्वरित सुमारे ३२५ कोटी रुपयांचा शेवटचा हफ्ता नुकताच वितरित करण्यात आला आहे. रब्बी हंगाम २०१८-१९ साठी फ्युचर जनरल इन्शुरन्स, बजाज अलायन्झ आणि भारती अ‍ॅक्सा या तीन कंपन्यांमार्फत पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com