वीजतोडणीस तीन महिने स्थगिती

मुंबई : राज्यातील कृषिपंपांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजजोड पुढील तीन महिने तोडणार नाही, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (ता.१५) विधानसभेत केली. महावितरण आर्थिक अडचणीत आहे. तरीही पुढील तीन महिने पीक हातात येईपर्यंत वीजजोड तोडले जाणार नाहीत,’’ असे राऊत म्हणाले.
Three months suspension of power cuts
Three months suspension of power cuts

मुंबई : राज्यातील कृषिपंपांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजजोड पुढील तीन महिने तोडणार नाही, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (ता.१५) विधानसभेत केली. महावितरण आर्थिक अडचणीत आहे. तरीही पुढील तीन महिने पीक हातात येईपर्यंत वीजजोड तोडले जाणार नाहीत,’’ असे राऊत म्हणाले. 

राज्यात गेल्या दीड-एक महिन्यापासून शेतीपंपांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. ऐन उन्हाळ्यात पिके पाण्यावर आलेली असताना वीज तोडणी केली जात होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले. या विरोधात अनेक भागात आंदोलने सुरू आहेत.  विरोधकांपासून सत्ताधाऱ्यांनीही वीज तोडणी मोहीम थांबविण्याची मागणी केली होती. या विरोधात मंगळवारी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधिमंडळात जोरदार गदारोळ केल्यानंतर अखेर सरकार काहीसे नरमले आहे. 

राऊत म्हणाले, ‘‘‘सध्या राज्यात महावितरणची ६४ हजार कोटींची थकबाकी आहे. ४४ हजार ९२० कोटी रुपयांची कृषिपंपांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आम्ही ‘कृषी धोरण २०२०’ आणि विलासराव देशमुख अभय योजना आणली आहे. तसेच कृषी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी शिबिरे सुरू आहेत. तरीही थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी वीजजोड तोडली जात आहेत. मात्र सभागृहात आणि सभागृहाबाहेर या बाबत भावना तीव्र आहेत. त्यामुळे वीजजोड तोडणी तात्पुरती मागे घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे जोड तोडले आहेत. ते परत जोडले जातील. महावितरणला वीजबिले आणि सरकारने अनुदान हे दोन आर्थिक स्रोत आहेत. औष्णिक वीज प्रकल्पांत दोन दिवस पुरेल इतका कोळसा कधी कधी उपलब्ध असतो. त्यामुळे महावितरण ही सरकारी कंपनी राहावी, यासाठी बिले भरली पाहिजेत.’’

सभागृहात आणि सभागृहाबाहेर याबाबत भावना तीव्र आहेत. त्यामुळे वीजजोड तोडणी तात्पुरती मागे घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे जोड तोडले आहेत. ते पुन्हा जोडले जातील. पुढील तीन महिने जोड तोडले जाणार नाहीत. - नितीन राऊत, ऊर्जामंत्री

वीजप्रश्‍नी सभागृह दणाणले

मुंबई : राज्यात कृषिपंपांच्या वीज तोडणीविरोधात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत मंगळवारी (ता.१५) आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच या प्रश्‍नी गदारोळाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृह चार वेळा गोंधळामुळे तहकूब करावे लागले. 

संतप्त सदस्यांनी या वेळी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मतदारसंघात लोकप्रतिनिधी गेल्यावर शेतकरी वीजजोड कधी जोडून देणार, असे प्रश्‍न विचारून हैराण करत आहेत. सभागृहात किती दिवस वांझोट्या चर्चा करणार. शेतकरी मरत असताना आम्ही नुसत्या चर्चा करायच्या का? आजच्या आज सभागृहात घोषणा झाली पाहिजे, अशी मागणी करत वीज प्रश्‍नावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरत एकत्र चर्चेची मागणी केली. शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी वीजजोड तोडणीचा मुद्दा मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. याला विरोधी पक्षाने बळ देत विजेच्या प्रश्नावर एकत्र चर्चेची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह पहिल्यांदा तीन वेळा तहकूब केले. 

कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. अधिवेशन सुरू आहे, तरीही शेतकऱ्यांचे वीजजोड कापले जात आहेत. भुईमूग, हरभरा पीक आता वाळून जात आहे. महावितरण आडमुठेपणा करत आहे. महावितरण वीजजोड कापत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. त्यामुळे ही मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली. याप्रश्‍नी विरोधकांनी कल्याणकर यांची मागणी उचलून धरत वेलमध्ये प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेत याप्रश्‍नी एकत्र चर्चेची मागणी केली होती. ती मान्यही झाली होती. वीजजोड तोडणे सुरूच आहे. ते तत्काळ बंद झाले पाहिजे. हा प्रश्‍न जिकिरीचा आहे. हा विषय चर्चेला आला पाहिजे. सर्व कामकाज बाजूला ठेवून या  विषयावर चर्चा करा, अशी त्यांनी मागणी केली.  फडणवीस म्हणाले, ‘‘शेतकरी अडचणीत असताना महावितरण वीजजोड तोडत आहे. रोज आत्महत्या होत आहेत. राज्य सरकार सावकारी वसुली करत आहेत. आजच वीजजोड तोडणे बंद करावे.’’ मात्र गोंधळ वाढत गेल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले. 

सभागृह सुरू झाल्यानंतर सभापतींनी विरोधकांना आवाहन केले. या विषयावर चर्चा होईल. पुढील कामकाज सुरू करावे, असे सांगत प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मात्र शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विजेचा प्रश्‍न पुन्हा मांडला. त्यानंतर कल्याणकर यांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे मुद्दा मांडत ‘शेतकरी आमचे मायबाप आहेत, वीजतोडणी बंद करावी, आम्ही मुद्दा मांडतो, त्याचे श्रेय घेऊ नका. यावर चर्चा केली पाहिजे’, अशी मागणी केली. 

फडणवीस ‘आम्हाला श्रेय नको, पण प्रश्‍न सोडवा’ असे म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना दोन आठवडे आम्हाला आश्‍वासन का देता, असे विचारत फडणवीस यांनी सरकारला कोंडीत पकडले. ‘सरकार केवळ आश्‍वासन देत आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही त्यावर चर्चा होत नाही. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाचे नाव घेऊन चर्चा करा. पण प्रश्‍न सोडवा,’’ अशी मागणी त्यांनी केली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शेतकरी अडचणीत असताना महावितरण वीजजोड तोडत आहे. रोज आत्महत्या होत आहेत. राज्य सरकार सावकारी वसुली करत आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते, विधानसभा

अधिवेशन सुरू आहे, तरीही शेतकऱ्यांची वीजजोड कापले जात आहेत. भुईमूग, हरभरा पीक आता वाळून जात आहे. महावितरण आडमुठेपणा करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. मोहीम तत्काळ थांबवावी.  - बालाजी कल्याणकर, शिवसेना आमदार, नांदेड उत्तर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com