तीन कारखान्यांची धुराडी ऊस, मजूरटंचाईमुळे बंद

sugarcane crushing
sugarcane crushing

पुणे: हाती पुरेसा ऊस व तोडणीला मजूर नाही; तरीही यंदा गाळपाचा केलेला अट्टाहास काही साखर कारखान्यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. तीन साखर कारखान्यांनी तर दोन आठवड्यातच धुराडी बंद केली आहेत.  पाणीटंचाईमुळे गाजत असलेल्या मराठवाडा भागातील ''शरद पैठण'' सहकारी साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० टनाची आहे. यंदा पुरेसा ऊस नसला तरी कारखान्याचे धुराडे १३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, २६०० टन ऊस गाळप करून २५ डिसेंबरला कारखाना बंद करावा लागला. नगरच्या ''केदारेश्वर'' कारखान्याची क्षमता प्रतिदिन २५०० टन गाळपाची आहे. तीन डिसेंबरला 'केदारेश्वर' सुरू करून दोन हजार टनाचे गाळप होते ना होते; तोच ९ डिसेंबरला गाळप बंद करण्यात आले. “बीडच्या 'जयभवानी' सहकारी साखर कारखान्याने सात डिसेंबरला हंगाम सुरू केला होता. या कारखान्याकडेही पुरेसा ऊस नव्हता. त्यामुळे २२ हजार टनाचे गाळप करून धुराडे बंद करावे लागले आहे. मुळात मजूरटंचाई आणि उसाची उपलब्धता नसताना या कारखान्यांनी धुराडी पेटवून आर्थिक ताण ओढावून घेतला,” असे मत साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केले.  साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यंदा कमी ऊस उपलब्धता असल्याने कारखाने लवकर बंद होण्याचे संकेत आधीच दिले होते. “राज्यात उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा केवळ ७० ते ९० दिवसांचा राहील,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. क्षमता नसल्यास कारखान्यांनी यंदा हंगाम न घेणेदेखील आर्थिकदृष्ट्या हिताचे राहील, असेही आयुक्तालयाने सूचित केले होते. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करून काही कारखान्यांनी धुराडी पेटवली.  २०७ लाख क्विंटल साखर उत्पादन आतापर्यंत राज्यात १४० साखर कारखान्यांनी २०२ लाख टन ऊस गाळप केले. त्यातून २०७ लाख क्विंटल साखर तयार झाली असून उतारा १०.२३ टक्के मिळतो आहे. सध्या ७५ सहकारी आणि ६५ खासगी कारखाने सुरू आहेत. "ऊसटंचाई असल्याने कसाबसा हंगाम रेटणाऱ्या काही कारखान्यांच्या नाकी दम आला आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारीअखेर बहुतेक कारखान्यांना हंगाम आवरावा लागेल," असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com