कृषी संजीवनीच्या लाभासाठी तीन हजारांवर अर्ज

कृषी संजीवनीच्या लाभासाठी तीन हजारांवर अर्ज
कृषी संजीवनीच्या लाभासाठी तीन हजारांवर अर्ज

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या गावांमधील समिती सदस्यांचे बुधवारी (ता. ६) प्रशिक्षण झाले. हवामान बदल आ णि त्याचा परिणाम होत असलेल्या गावांची या प्रकल्पात निवड करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात वैयक्तिक लाभासाठी सुमारे तीन हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. यापैकी सुमारे ६५० अर्ज ग्राम समित्यांनी मंजूर केले.

वातावरण बदलाचा परिणाम शेती व पर्यायाने गावांवर होत आहे. याची दखल घेत शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत आणि ५१४२ गावांत राबविण्याची घोषणा केली. १५ जिल्ह्यात सुमारे चार हजार कोटींचा हा प्रकल्प २०२४ पर्यंत राबवला जाणार आहे. प्रकल्पातील गावांना सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीकपद्धती, कृषिपूरक व्यवसाय, मृदसंधारण, गटांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांना फळबाग, शेडनेट, हरितगृह, प्लॅस्टिक टनेल, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, विहीर, विहीर पुनर्भरण, ठिबकसिंचन, तुषार सिंचन, अौजारे, मृदसंधारण, शेततळे, सामूहिक शेततळे, इतर कृषी आधारित व्यवसायासाठी पाठबळ दिले जाणार आहे. जिल्ह्याला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ७० लाख रुपये खर्च झाले. अद्याप सुमारे दोन कोटी ८२ लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती मिळाली.    अकोट व अकोला या दोन उपविभागांतील गावे निवडण्यात आली आहेत. प्रामुख्याने विदर्भातील खारपाण पट्ट्यात येणारी गावे व मराठवाडा, खानदेशातील दुष्काळी जिल्ह्यातील गावांचा यात समावेश आहे. 

प्रस्ताव मंजुरीची गती संथ वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३०७५ अर्ज अकोट व अकोला उपविभागांतून आले आहेत. यापैकी ६५० अर्जांना ग्रामस्तरीय समित्यांनी मंजुरी दिली. त्यातील ६३२ अर्ज उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी २५५ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यातील ३३ लाभार्थी प्रस्तावांना अनुदान वितरित करण्यात आले. तुलनात्मक विचार केल्यास दाखल प्रस्ताव, त्यापैकी पूर्वसंमती दिलेल्या प्रस्तावांचे प्रमाण कमी आहे. उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर मंजुरी देण्याच्या प्रक्रीयेस गती देण्याची गरज आहे. अन्यथा निधी शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com