कोल्हापूर, सांगलीत कडकडीत बंद

tightly closed in Kolhapur, Sangli
tightly closed in Kolhapur, Sangli

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांतर्फे बुधवारी (ता. ८) बंद पुकारण्यात आला. जिल्ह्यातील बहुतांशी गावे सकाळी बंद राहिली. कोल्हापूर- सांगली महामार्गावर सकाळी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ महामार्ग बंद राहिला. सांगली जिल्ह्यात अनेक गावांतील ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या. दहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला गेला. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पूर्ण करावे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला गेला पाहिजे, यांसह शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविल्या पाहिजेत आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला. कोल्हापुरात अनेक जिल्हा मार्गावर ही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडल्याने गावंतर्गत वाहतुकीवर ही परिणाम झाला.

दरम्यान शेतीमाल वाहतूक सुरळीत होती. हळदी (ता. करवीर) येथे शेकापच्या वतीने माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या नेतत्वाखाली रास्ता रोको झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले. व्यवहार विस्कळित झाले. 

सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगलीत अनेक गावांतील ऊसतोडी बंद पाडल्या. जिल्ह्यातील लक्ष्मीफाटा, वसगडे, शिरढोण येथे शेतकरी संघटनांनी रास्ता रोको केला. प्रामुख्याने मागणी सरकरट कर्जमाफी, दूध दरवाढ, सातबारा कोरा, स्वामिनाथन आयोग लागू करा, आरसीईपी करार रद्द करा, अन्य मागण्यांसाठी गावागावांत व्यवहार बंद ठेवले. सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आल्या. तासगाव येथील बाजार समिती बंद होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग  घेतला. 

कोल्हापुरात बाजारपेठा बंद

जिल्ह्यातील अनेक गावांतील व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळता बंद होते. यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा ठप्प झाल्या. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर- सांगलीला जोडणाऱ्या अंकली टोल नाका येथे ठिय्या मांडला. शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.

सांगली-इस्लामपूर मार्ग रोखला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी सांगली-इस्लामपूर मार्गावर ठिय्या मारत रस्ता रोखून धरला होता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, उसाला योग्य भाव द्यावा, तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com