जळगाव : चराईसाठी किरकोळ कामे करण्याची मेंढपाळांवर वेळ

चराईसाठी किरकोळ कामे करण्याची मेंढपाळांवर वेळ
चराईसाठी किरकोळ कामे करण्याची मेंढपाळांवर वेळ

जळगाव : खानदेशात धुळे, साक्री भागांतून चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जामनेर आदी तालुक्‍यांत स्थलांतर करणाऱ्या मेंढपाळ बांधवांना शेतात खतासाठी आपल्या मेंढ्या बसविण्यासंबंधीचे दर शेतमालक किंवा शेतकऱ्यांकडून मागील हंगामाच्या तुलनेत कमी मिळत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना किरकोळ कामांसाठी मदतही या मंडळीला मेंढ्या चराईसाठी करावी लागत असल्याची स्थिती असून यंदा दुष्काळामुळे दर कमी मिळण्यासह शेतातील किरकोळ कामे करण्यांची वेळ मेढपाळांवर आल्याचे चित्र आहे.  खानदेशात धुळे, साक्री भागांत शेकडो मेंढपाळ बांधव असून, ते दिवाळीनंतर चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर आदी तालुक्‍यांमध्ये तापी, गिरणाकाठी मेंढ्या चराईसाठी येतात. यंदा दुष्काळ असल्याने शिवारात फारसा चारा नाही. शेतकरीही वित्तीय संकटात आहे. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे व अधिक क्षेत्र आहे, असे मोठे शेतकरी आपल्या शेतात दोन-तीन दिवस मेंढ्या बसवून घेतात. एका गटात सुमारे १००० ते दीड हजार मेंढ्या असतात. यामुळे शेतात मेंढ्यांच्या लेंड्या, मूत्र पडते व जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे शेतकरी मानतात. मागील हंगामात प्रतिदिन १००० रुपये, असे दर मेंढपाळांना शेतमालक देत होते. या हंगामात किंवा उन्हाळ्यात मात्र हे दर ८०० ते ९०० रुपये प्रतिदिन, असे आहेत.  मेंढपाळ बांधव ज्या गावात येतात, त्या गावातील ९० टक्के शिवार चराईसाठी घेतात. त्यापोटी संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीला मेंढपाळ बांधव निधी देतात. शिवार मोठे असले तर हा निधी एक लाख रुपयांपर्यंत द्यायचा असतो. शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ते मेंढ्या चराईसाठी नेतात. सध्या कांदा, बाजरीची मळणी आटोपली आहे. परंतु शेतात पात, ठिबकच्या नळ्या विखुरलेल्या असतात, यामुळे संबंधित क्षेत्रात मेंढपाळ मेंढ्या चराईसाठी नेऊ शकत नाहीत.  तसेच तीव्र चाराटंचाई असल्याकारणाने अशा शेतात मेंढ्या चराईसाठी नेता याव्यात, यासाठी मेंढपाळ बांधव संबंधित शेतातील ठिबकच्या नळ्या, कांदापात गोळा करून देण्याचे कामही मोफत करीत आहेत. केळी, मका पिकाखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रातील नळ्याही ही मंडळी गोळा करून देते. मग त्यात आपल्या मेंढ्या चराईसाठी पाठविल्या जातात. ही स्थिती दुष्काळामुळे तयार झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com