कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे-नगर जिल्ह्यात मोठा फटका

जुन्नर, आंबेगावसह लगतच्या शिरुर तालुक्यामध्ये उन्हाळी टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी कोरोनामुळे लागवड खोळंबल्याने बुकिंग केलेली सुमारे दीड कोटी रोपे रोपवाटिकांमध्ये शिल्लक आहेत. लॉकडाऊन आणखी किती काळ चालेल याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळले आहेत. यामुळे केलेली रोपांची वाढ जास्त झाल्याने ती कालबाह्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह रोपवाटिकांचे देखील नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. - राजेश गावडे, अध्यक्ष, जुन्नर आंबेगाव तालुका नर्सरी असोसिएशन
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन 
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन 

पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर हे तालुके टोमॅटोचे हब बनले आहे. नारायणगांव उपबाजारात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे बाजारातील आवक खुपच घटली आहे. उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड न करता बाजरी पिकाला प्राधान्य दिले आहे. यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात उन्हाळी टोमॅटोच्या लागवडीत घट झाली आहे. तर, टोमॅटोच्या थेट विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नारायणगांव उपबाजारातील कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.  गेल्या काही वर्षांपासून ठिबक आणि मल्चिंग पेपरवर उन्हाळी टोमॅटो लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्‍या पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या नारायणगांव उपबाजारात अडत्यांशिवाय शेतकरी ते खरेदीदार बाजारपेठ विकसित झाल्याने या ठिकाणी देशातील खरेदीदार मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे गेल्या १५ वर्षात जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर हे तालुके टोमॅटोचे हब बनले आहे. दरवर्षी उन्हाळी टोमॅटोची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.  या परिसरात गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेला टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र यंदा ऐन लागवडीच्या हंगामातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने वाहतुकीबरोबर शेतीसह सर्वच कामे ठप्प झाली आहेत. याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनासह बाजारपेठेवर होत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील नारायणगांव येथील टोमॅटोच्या उपबाजारावर अवलंबून आहेत. या पाचही तालुक्यांत प्रत्येकी सुमारे १० हजार एकरवर म्हणजेच सुमारे ५० हजार एकरवर टोमॅटोची लागवड असते. हि लागवड यंदा २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच होण्याची शक्यता आहे.  याबाबत बोलताना शेतकरी संजय वर्पे (रा.धामणखेल,ता.जुन्नर) म्हणाले, ‘‘मी दरवर्षी दीड ते दोन एकरवर टोमॅटोची लागवड करत असतो. यामधून साधारण दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. यंदाही लागवडीची तयारी केली होती. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन किती दिवस चालेल याचा अंदाज नाही. यामुळे एक लाख रुपये गुंतवणूक करण्याचा धोका पत्करलेला नाही. यंदा टोमॅटो ऐवजी दोन एकर बाजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.’’  जुन्नरच्या राकेश कृषी उद्योगाचे संचालक राकेश पांडव म्हणाले, ‘‘तालुक्यात दरवर्षी टोमॅटो लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर निविष्ठांची खरेदी होत असते. यंदा मात्र कोरोनामुळे दर मिळतील कि नाही या भीतीने केवळ २० ते २५ टक्केच निविष्ठांची खरेदी होत आहे. बाजरीतून खाण्याला आणि पशुधनासाठी वैरण पण होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी बाजरी पिकाला प्राधान्य दिले आहे. मी दरवर्षी बाजरीचे साधारण ४०० ते ४५० किलो बियाणे विक्री करतो. यंदा हि विक्री १ हजार किलोपर्यंत वाढली असून, शेतकऱ्यांची आणखी मागणी असून बियाण्यांची वाहने बंद असल्याने बियाण्यांची टंचाई जाणवू लागली आहे. मात्र दर स्थिर आहेत.’’ 

न्यू अभिजीत हाय टेक रोपवाटीकाचे संचालक दिपक सोन्नर म्हणाले, ‘‘मी दरवर्षी सुमारे १५ लाख टोमॅटोच्या रोपांची विक्री करतो. जुन्नर, आंबेगाव परिसरात गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीयेपर्यंत लागवडी सुरु असतात. मात्र कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लागवडी खोळंबल्या आहेत. सध्या माझ्याकडे ६ लाख रोपे तयार असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ३ लाख रोपांची विक्री झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी बुकिंग केलेली रोपे देखील नेण्याचे टाळले आहे. तर आम्ही देखील रोपे बनविण्याचे थांबविले आहे.’’ 

  गेल्यावर्षी १७३ कोटींची उलाढाल  कोरोनामुळे यंदा टोमॅटो बाजारपेठ ठप्प झाली आहे. देशभरात टोमॅटो पाठविणारे सुमारे २०० खरेदीदार नारायणगांव बाजारात अद्याप आलेलेच नाहीत. गेल्या वर्षी नारायणगांव उपबाजारात ४८ लाख ६९ हजार क्रेटची आवक झाली होऊन सरासरी प्रतिक्रेट २५० रुपये दर मिळाला होता. तर सर्वाधिक दर ६०० रुपयांपर्यंत होता. यातून सुमारे १७३ कोटींची उलाढाल झाली होती. आता तुरळक आवक असून सध्याचा दर केवळ ५० ते १०० रुपये एवढाच आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर झाले नाही तर शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपयांच्या नुकसानीची भिती आहे, असे जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com