राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल

अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी असल्यामुळे हे दर कडाडल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे टोमॅटोची लागवड कमी आहे. दरवर्षी या काळात मोठी आवक व्हायची. यंदा आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत.येथील बाजारात मागील आठ ते दहा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. बाजारात अकोला जिल्ह्यासह खानदेशातून टोमॅटोची थोडीफार आवक होत आहे. उच्चतम प्रतिचा टोमॅटो प्रतिक्रेट ५५० रुपयांपर्यंत गुरुवारी (ता. १४) विकल्या गेला. बाजारात सरासरी ४०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत टोमॅटोला दर मिळाले. येत्या काळात आवक वाढली तर दरांवर परिणामाची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

साताऱ्यात प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ६५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस प्रतिक्विंटलला १००० ते १७०० असा दर मिळाला आहे. टोमॅटोचे दर ८०० ते २०० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कोरेगाव, खटाव, सातारा, फलटण तालुक्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. रविवारी (ता. १०) मार्चला टोमॅटोची १२५ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ८०० ते १५०० असा दर मिळाला होता. पाच मार्च १६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १००० ते २००० असा दर मिळाला होता. २८ फेब्रुवारीस ८८ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ६०० ते १३०० असा दर मिळाला होता. टोमॅटोची २० ते २५ रुपयेप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ५०० ते १७०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची १६७ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोला प्रतिक्‍विंटलला ५०० ते १७०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात टोमॅटोच्या आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाले. २० फेब्रुवारीला २१७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ मार्चला १३६ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ मार्चला २२२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ मार्चला टोमॅटोची आवक १६५ क्‍विंटल तर दर ५०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ मार्चला १७५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर १३ मार्चला २४४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात प्रतिक्विंटल २०० ते १५०० रुपये  सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक वाढली, पण दरामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. टोमॅटोचे दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या सप्ताहात टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हीच आवक प्रतिदिन ८० ते १२५ क्विंटल राहिली. तर टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान १५० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि कमाल १६०० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात टोमॅटोची आवक रोज १०० ते १५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली; पण बाहेरील आवकही सुरू होती. विशेषतः पुणे, सांगली, उस्मानाबाद भागांतून ही आवक होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही थोड्याफार फरकाने तशीच स्थिती राहिली. या सप्ताहात आवकेत मात्र काहीशी घट झाली. या सप्ताहात प्रतिदिन ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक होती आणि दर टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६५० रुपये आणि कमाल १५०० रुपये असा दर मिळाला.

परभणीत प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी टोमॅटोची ६०० ते ८०० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते १५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ८०० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ३० रुपये किलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

कोल्हापुरात ५० ते २०० रुपये प्रतिदहा किलो कोल्हापूर ः येथील बाजार समितीत टोमॅटोची एक ते दीड हजार क्रेट आवक होत आहे. टोमॅटोस दहा किलोस ५० ते २०० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत टोमॅटोची बहुतांशी करून हातकणंगले सर्व बरोबरच सांगली बेळगाव जिल्ह्यातून ही आवक होते. आठवड्यापूर्वी टोमॅटोची आवक काहीशी कमी होती; पण आता टोमॅटोची आवक वाढत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  सध्या सांगली जिल्ह्यातील विटा, कवठेमंकाळ तालुक्यांतून काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे. दरात मात्र कोणतीच सुधारणा नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. वाढत्या उन्हामुळे टोमॅटो वेगात पिकण्याची शक्यता असल्याने ऊन जसे वाढेल तशी टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

सांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये सांगली  : येथील शिवाजी मंडईत टोमॅटोची आवक कमी होऊ लागली आहे. आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची २५० ते ३०० क्रेट (एक क्रेट २२ ते २५ किलोचे) आवक झाली असून प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.मंडईत सांगली जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, मिरज, दुधगाव, समडोळी, कवठेपिरान यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून आवक होते. बुधवारी (ता. १३) टोमॅटोची २०० ते २५० क्रेट आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १२) टोमॅटोची २०० ते २५० किलोची आवक झाली होती. टोमॅटोस प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. वाढत्या उन्हामुळे टोमॅटोची आवक घटली असून टोमॅटोच्या दरात प्रति दहा किलोला ५ ते १० रुपयांनी दरात वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गाने वर्तवली आहे.

नगरला प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये नगर ः नगर कृषी बाजार समितीत गुरुवारी (ता. १४) १४२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला ५०० ते २५०० रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर बाजार समितीत टोमॅटोची आवक सुरूच असून दर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत १६० क्विंटलपर्यंत दर दिवसाला आवक होत असते. ७ मार्चला ११८ क्विंटलची आवक झालेली असून ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. २६ फेब्रुवारीला ७२.५५ क्विंटलची आवक झाली असून ३०० ते २००० व सरासरी १०७५ रुपयांचा दर मिळाला, तर २१ मार्चला ५४ क्विंटलची आवक होऊन ३०० ते १८०० रुपये व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. १४ फेब्रुवारीला १२८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० व सरासरी ११५०रुपये आणि ७ फेब्रुवारीला १५२ क्विंटलची आवक होऊन  ५०० ते १६०० व सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

गुलटेकडी येथे ८० ते २०० रुपये प्रतिदहा किलो पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची सुमारे चार हजार क्रेट आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ८० ते २०० रुपये दर होता. उन्हाळ्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले असून आवकदेखील कमी होत चालली आहे. परिणामी दरात वाढ होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com