राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) टोमॅटोची ११० क्विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
Tomatoes in the state cost Rs 150 to Rs 1,000
Tomatoes in the state cost Rs 150 to Rs 1,000

औरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) टोमॅटोची ११० क्विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. तर, सरासरी दर ४५० रुपये प्रतिक्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ फेब्रुवारीला १३५ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० फेब्रुवारीला १२४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ५२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २१ फेब्रुवारीला ८० क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

२२ फेब्रुवारीला ११२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २३ फेब्रुवारीला १६० क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ४५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

नगरला क्विंटलला ४०० ते ८०० रुपये  

नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून टोमॅटोची दर दिवसाला साधारण ८० ते ११० क्विंटलची आवक होत आहे. टोमॅटोला येथे ४०० ते ८०० रुपये, तर सरासरी ६०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. 

अलीकडच्या काळात टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने टोमॅटोच्या आवकेत व दरात चढउतार होत आहे.  नगर येथील बाजार समितीत मागील १५ दिवसांच्या तुलनेत काहीशी आवक वाढत आहे. त्याचा परिणाम दरावर होत आहे. २० फेब्रुवारी रोजी १४१ क्विंटलची आवक झाली. ४०० ते १ हजार रुपये व सरासरी ७०० रुपयांचा दर मिळत आहे.  

१६ फेब्रुवारी रोजी ९८ क्विटंलची आवक होऊन ५०० ते १ हजार व सरासरी ७५० रुपयांचा दर मिळाला. १४ फेब्रुवारी रोजी १०३ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १००० व सरासरी ७५० रुपये दर मिळाला. ११ फेब्रुवारी रोजी १७० क्विटंलची आवक होऊन ४०० ते ८०० रुपये व सरासरी ६०० रुपयांचा दर मिळाला.

९ फेब्रुवारी रोजी १६५ क्विंटलची आवक होऊन ३०० ते ८०० व सरासरी ५५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. गेल्या महिनाभरात सातत्याने टोमॅटोच्या आवकेत व दरात चढउतार होत आहे.

सांगलीत क्विंटलला ५०० ते ७०० रुपये

सांगली ः येथील शिवाजी मंडईत टोमॅटोची गुरुवार (ता. २५) आवक ५०० ते ६०० क्रेट (२० किलोचे एक क्रेट) झाली. त्यास प्रतिदहा किलोस ५० ते ७० रुपये, तर सरासरी ६० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत कडेगाव, विटा, वाळवा तालुक्यातून टोमॅटोची आवक होते. बुधवारी (ता. २४) टोमॅटोची आवक ५०० क्रेट आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस ४० ते ७० रुपये, तर सरासरी ५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २३) टोमॅटोची आवक ६०० क्रेट झाली. त्यास प्रति दहा किलोस ५० ते ८० रुपये, तर सरासरी ७० रुपये असा दर मिळाला. 

सोमवारी (ता. २२) टोमॅटोची ७०० क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रतिदहा किलोस ५० ते ८० रुपये तर सरासरी ७० रुपये असा दर मिळाला. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली असली, तरी दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पुढील सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे.

परभणीत क्विंटलला १५० ते ३५० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२५) टोमॅटोची ८००० क्रेट आवक होती. टोमॅटोला प्रतिक्रेट किमान ३० ते कमाल ७० रुपये, तर सरासरी ५० रुपये  (प्रतिक्विंटल किमान १५० ते कमाल ३५० रुपये तर सरासरी २५० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून टोमॅटोची आवक वाढली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी टोमॅटोची २००० ते ८००० क्रेट आवक झाली. त्यावेळी  प्रतिक्रेट ३० ते १२० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२५) टोमॅटोची ८००० क्रेट आवक होऊन घाऊक विक्री प्रतिक्रेट ३० ते ७० रुपये दराने झाली. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ५ ते १० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात क्विंटलला ५०० ते १००० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२५) १८ क्विंटल एवढी टोमॅटोची आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते १०० व सरासरी ८०० रुपये मिळाला.

आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, औरंगाबादमधील सोयगाव, फुलंब्री आदी भागातून होत आहे. दरात किंचित सुधारणा झाली आहे. मध्यंतरी किमान दर ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर होते. 

अकोल्यात क्विंटलला सरासरी ५०० रुपये

अकोला ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेतील आवक व दरावर मोठा परिणाम दिसू लागला आहे. येथील जनताभाजी बाजारात गुरुवारी (ता.२५) टोमॅटोची प्रतिक्रेट १०० ते १२० रुपयांदरम्यान विक्री झाली.

एक क्रेट साधारणपणे २० किलो वजनाचा राहतो. या बाजारात टोमॅटोची आवक ५०० क्रेटपर्यंत झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. अकोला बाजारपेठेत सध्या स्थानिक भागातील टोमॅटोची आवक आहे.

नव्याने लागवड झालेला माल विक्रीसाठी येत आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोची आवक हजार क्रेटपर्यंत होती. शिवाय दरही २०० रुपयांपर्यंत प्रतिक्रेटला मिळत होता. मात्र सध्या दर खाली आहेत. त्यातच कोरोनाच्या उपाययोजनांमुळे बाजारातील उलाढाल कमी झाली. 

नांदेडमध्ये क्विंटलला ३०० ते ५०० रुपये 

नांदेड : नांदेडमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. शहरातील इतवारा तसेच तरोडा भागातील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापाऱ्यांनी दिली.

नांदेड बाजारात सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा टोमॅटो येत आहे. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. शहरातील इतवारा तसेच पूर्णा रोडवरील तरोडा बाजारात सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा दररोज २० ते २५ टन टोमॅटो बाजारात येत आहे. यास प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी महंमद जावेद यांनी दिली.

आठवडे बाजारात टोमॅटो ७ ते १० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. टोमॅटोला बाजारात दर नसल्यामुळे सुरु झालेला टोमॅटो प्लॉट काढून भेंडीची लागवड केल्याची माहिती नांदा (ता. भोकर) येथील शेतकरी अनुरुथ कदम यांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटलला  ५०० ते १००० रुपये

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२५) टोमॅटोची सुमारे ८ हजार क्रेट आवक झाली. यावेळी दहा किलोला सुमारे ५० ते १०० रुपये दर होता. 

‘‘सध्या होणारी आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. आवक सरासरीच्या तुलनेत जास्त होत आहे. तुलनेने मागणी कमी असल्याने दर सरासरी आहेत’’, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, पुणे बाजार समितीनंतर टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारातील खुल्या टोमॅटोच्या बाजारामध्ये बुधवारी (ता.२४) सुमारे ४ हजार क्रेटची आवक झाली होती. यावेळी दहा किलोला १०० ते १५० रुपये दर होते. हे दर आणि आवक कायम आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com