शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'

गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये देणे म्हणजे टीएमआर (टोटल मिक्स रेशन) होय. यामध्ये दूध उत्पादनानुसार आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार करून हिरवा, वाळलेला चारा तसेच खाद्य, खनिज मिश्रण या सर्व घटकांचे एकत्रित मिश्रण गायींना देण्यात येते. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
for the sustainable milk production provide the Total Mixed Ration in diet of cow
for the sustainable milk production provide the Total Mixed Ration in diet of cow

गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये देणे म्हणजे टीएमआर (टोटल मिक्स रेशन) होय. यामध्ये दूध उत्पादनानुसार आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार करून हिरवा, वाळलेला चारा तसेच खाद्य, खनिज मिश्रण या सर्व घटकांचे एकत्रित मिश्रण गायींना देण्यात येते. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. प्रगत देशांमध्ये एक गाय एका वेताला १२ ते १५ हजार लिटर दूध देते. तेच प्रमाण आपल्याकडे २००० ते २५०० लिटरच्या दरम्यान आहे. संकरीकरणामुळे आपल्याकडे धवलक्रांती झाली. आपल्याकडे संकरित गाई आल्या, परंतु त्यांचे व्यवस्थापन मात्र पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. दूध उत्पादकता वाढविण्यासाठी संकरीकरणासह गोठ्याचे व्यवस्थापन आणि चारा, खाद्य व्यवस्थापन गरजेचे आहे. आपल्याकडे चाऱ्याचे कुपोषण आहे. चाऱ्यामध्ये बदल झाला की गाईच्या पोटामध्ये पचविण्यासाठी आवश्यक असलेल्या जैविक-रासायनिक प्रक्रियेमध्ये बदल करावा लागतो. अन्यथा गाईची दूध उत्पादकता आणि आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. गाय गाभण न राहणे, गाई उलटणे यासारखे प्रजननाचे प्रश्‍न तयार होतात. दुग्ध व्यवसाय व्यावहारिक दृष्टीने किफायतशीर होऊन शेतकऱ्यांना उद्योजकतेकडे घेऊन जाण्यासाठी ‘टोटल मिक्स रेशन’सारखी संकल्पना राबविणे गरजेचे आहे. ‘टीएमआर’ म्हणजे काय?

  • टीएमआर (टोटल मिक्स रेशन) म्हणजे गायीला शरीर वजनानुसार लागणारी अन्नद्रव्ये तसेच दूध उत्पादनानुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा विचार करून हिरवा व वाळलेला चारा तसेच खाद्य, खनिज मिश्रण या सर्व घटकांचे एकत्रीकरण.
  • गाईच्या एकूण कार्यपद्धतीचा विचार करून आवश्यक सर्व मूलद्रव्ये, खनिजे, अन्नद्रव्ये तसेच ऊर्जा यांचा विचार केला जातो.
  • टीएमआर तयार करताना गाईची रवंथ करण्याची क्रिया, गाईच्या पोटामध्ये सुरू असलेली पचनक्रिया यांचा विचार करून चाऱ्याचा आकार ठरविला जातो. या पद्धतीने प्रगत देशांमध्ये चारा व्यवस्थापन केले जाते. यामुळे त्यांची दूध उत्पादकता १२ ते १५ हजार लिटर प्रति वर्ष आहे.
  • दूध देणारी गाय, गाभण गाय, दूध न देणारी गाय, दुधाचे उत्पादन, दुधामधील फॅट आणि एसएनएफ, गाईचा बॉडी स्कोअर आणि वजन, चाऱ्याचा प्रकार, चाऱ्यामधील विविध अन्नघटक आणि पाणी, खाद्य प्रकारातील अन्नघटक या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून टीएमआर बनविले जाते.
  • टीएमआर बनविताना दररोज वर्षभर गाईला सारख्याच प्रमाणात विविध अन्नघटक दिले जातात. त्यामुळे गाईच्या दररोजच्या चयापचय क्रियेमध्ये जास्त बदल होत नाहीत. गाईचे दूध उत्पादन, आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो.
  • टीएमआर बनविताना शास्त्रोक्त पद्धतीने प्रथिने, ऊर्जा, तंतुमय पदार्थ, कर्बोदके, फॅट, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि इतर जैविके- प्रतिजैविके यांचा विचार करून संतुलित पद्धतीने वापर केला जातो. यामध्ये ३५ ते ४० टक्के कर्बोदके आणि ६० ते ६५ टक्के प्रथिने अशा ढोबळमानाने वर्गीकरण होते.
  • टीएमआर बनविण्यासाठी एका जागेवर किंवा फिरत्या यंत्राचा वापर करता येतो.
  • होणारे फायदे

  • ‘टीएमआर'मुळे गाईच्या पोटामध्ये अन्न पचनीय जिवाणूंची संख्या चांगली आणि संतुलित राहते. दिलेल्या खाद्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. दूध उत्पादनात वाढ होते, आरोग्य चांगले राहते.
  • एकत्रित चाऱ्यामधील नत्र आणि कर्बोदकांमुळे विघटन लवकर होते. जिवाणूंना प्रथिनांचा पुरवठा अखंडित सुरू राहतो. अन्नघटकांचा पुरेपूर वापर होतो.
  • टीएमआरमुळे खाद्याला एक प्रकारची चव निर्माण होऊन जनावरे आवडीने खातात. युरिया, चुना, बायपास फॅट, बायपास प्रोटिन जनावरांना वेगळे खाऊ घालणे अवघड असते. परंतु टीएमआरमुळे याचा वापर करणे सोपे जाते. पचनीयता वाढते.
  • ‘टीएमआर' करताना घ्यावयाची काळजी

  • गाईच्या प्रत्येक अवस्थेनुसार टीएमआरमध्ये अन्नघटकांचे वेगवेगळे प्रमाण असते. जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाई, मध्यम दूध उत्पादन देणाऱ्या गाई, कमी उत्पादन दूध देणाऱ्या गाई, दूध न देणाऱ्या गाई, विण्याच्या आधीच्या गाई, रेतनापूर्वीच्या कालवडी आणि गाभण कालवडी अशा सात गटांमध्ये टीएमआरची विभागणी होते. त्यांच्या आहारासाठी उपयुक्त अन्नद्रव्यांचा विचार करून टीएमआर बनविले जाते.
  • चारा आणि खाद्यपदार्थापासून टीएमआर बनविले जाते. त्यांचे परीक्षण करून त्यामध्ये असलेल्या अन्नघटकांनुसार मिश्रण करावे.
  • अर्धा ते एक इंच आकाराचे चाऱ्याचे तुकडे करून त्याचा वापर करावा. जास्त लहान तुकडे झाले तर गाईला अपचनासारखे आजार होतात. शुष्क घटक तसेच तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असावे.
  • ‘टीएमआर'च्या मर्यादा

  • गाईच्या विविध अवस्थांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सात गटांमध्ये टीएमआर बनविले जाते. ज्यांच्याकडे गाईंची संख्या कमी आहे त्यांना हा सर्व खर्च करणे परवडत नाही. यासाठी दूध उत्पादकांचा गट तयार करून या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो.
  • टीएमआर बनविताना चाऱ्याचे तुकडे योग्य प्रमाणात केले नाही किंवा धान्य व्यवस्थित बारीक केले नाही आणि सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळले नाही तर त्याचा फायदा होत नाही.
  • टीएमआरचे सर्व घटक योग्य मोजमाप करून तयार केले नाही तर फायद्याऐवजी तोटा होतो. शास्त्रोक्त पद्धतीनेच टीएमआर बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
  • भविष्यातील संधी

  • मुक्त गोठा, मुरघास या तंत्रज्ञानाबरोबरच दुग्ध व्यवसायाचे यांत्रिकीकरण होत आहे.
  • आज तरुण शेतकरी मुरघास निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करत आहे. मुरघास निर्मिती यंत्रणेमुळे या उद्योगाला गती आली आहे.
  • राज्यात ५० ते ५०० गाईंची क्षमता असलेले गोठे सुरू होत आहेत. त्यामुळे शाश्‍वत दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि अधिक फायद्यासाठी या डेअरी फार्मला चांगल्या प्रकारचा चारा, खाद्य पुरवठा करणे हा मोठा व्यवसाय आहे.
  • लहान आणि मध्यम डेअरी फार्मला टीएमआर पुरवठा करण्यासाठी सेवा-सुविधा निर्माण करून याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
  • गरजेनुसार प्रत्येक पशुपालकाला टीएमआर पुरवठा करण्याचे काम झाले तर दूध व्यवसाय शाश्‍वत होऊन ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • शेतकऱ्यांना करार पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन घेता येईल. त्यातून शाश्‍वत उत्पन्न मिळेल.
  • संपर्क- डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६० (संचालक, प्रभात डेअरी, श्रीरामपूर, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com