चीन-अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग गडद होणार

जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेने जगातील सर्वांत मोठ्या वस्त्रोद्योगाच्या म्हणजेच चीनच्या कापसापासून तयार झालेल्या वस्तूंवर (कापड, मास्क आदी) बंदी घातल्याने ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध बायडेन यांच्या कार्यकाळातही थांबणार नाही, असे संकेत दिसत आहे.
cotton_bales_gathi_web_1.JPG
cotton_bales_gathi_web_1.JPG

जळगाव : जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेने जगातील सर्वांत मोठ्या वस्त्रोद्योगाच्या म्हणजेच चीनच्या कापसापासून तयार झालेल्या वस्तूंवर (कापड, मास्क आदी) बंदी घातल्याने ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध बायडेन यांच्या कार्यकाळातही थांबणार नाही, असे संकेत दिसत आहे. या दोन्ही देशांमधील व्यापारात अडथळे आल्याने जगभरातील कापूस उद्योजक सावध भूमिकेत आहेत. याच वेळी चीनमधील कापड व इतर बाबींवर अमेरिकेने बंदी घातल्याने भारतासह बांगलादेश, व्हिएतनाम, तुर्की येथील वस्त्रोद्योगासमोर संधी चालून येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.   अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातल्याने न्यू यॉर्क वायदा ७४ सेंटवर स्थिर आहे. अमेरिकेने २०१९ मध्ये ११ हजार कोटी रुपये. कापड व कापसाच्या इतर उत्पादनांची आयात चीनमधून केली होती. यंदा यापेक्षा अधिक कापडाची आयात अमेरिकेकडून चीनमधून होण्याची शक्यता होती.

कापसाच्या दृष्टीने दोन्ही देश एकमेकांसाठी महत्त्वाचे कापूस उत्पादनात अमेरिका जगात तिसरा आहे. पण क्रमांक एकचा निर्यातदार आहे. तेथे या हंगामात सुमारे २५५ लाख गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई) अपेक्षित आहे. अमेरिका आपल्या ९२ ते ९३ टक्के कापसाची निर्यात जगभरात करतो. अमेरिकन कापसाचे खरेदीदार व्हिएतनाम, तुर्की, इजिप्त, बांगलादेश, चीन हे देश आहेत. तर चीन जगातला क्रमांक एकचा वस्त्रोद्योग असलेला देश आहे. तेथे दरवर्षी किमान साडेसात हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन घेतले जाते. चीनने बांगलादेश, तुर्कीमधील वस्त्रोद्योगातही गुंतवणूक केली आहे. चीनच्या कापडाचा मोठा खरेदीदार अमेरिका मानला जातो. अमेरिकेतील ब्रॅण्डसाठीदेखील चीन काम करतो. चीनने यंदा १०० लाख गाठींची आयात करण्याचे जाहीर केले होते. यातील कमाल आयात अमेरिकेकडून करण्याची तयारी चीन करीत होता. अर्थातच चीन वस्त्रोद्योगात क्रमांक एक असला, तरी हवे तेवढे कापूस उत्पादन चीन करू शकत नसल्याने चीन कापसाची आयात करतो. यात चीन अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांकडून अधिकचा कापूस किंवा रुई खरेदी करतो. तर भारताकडून रुईची खरेदी कमी व सुताची खरेदी अधिक करतो. चीनमध्ये भारताकडून यंदा सुमारे ८०० कोटी किलो सुताची निर्यात होण्याचे संकेत मिळत होते. परंतु अमेरिकेसारखा मोठा खरेदीदार हातून निसटल्याने चीन जगभरातून रुई, सुताची आयात कमी करील, असे संकेत आहेत. 

अमेरिकेच्या चीनसंबंधीच्या भूमिकेने जगभरातील कापूस उद्योग सावध झाला आहे. अमेरिकेच्या हालचालींमुळे मध्यंतरी कापूस बाजारात किरकोळ पडझड होऊन न्यू यॉर्क वायदा ७१ सेंटवर आला होता. अमेरिका पुन्हा व्यापार युद्ध तीव्र करील, अशी भीती वस्त्रोद्योगात तयार होत आहे. पण कापूस बाजार तूर्त स्थिर आहे. 

कोरोनाचे सावट दिसू लागले, हाँगकाँगचे बंदर बंद कोरोनाचे संकट लक्षात घेता हॉँगकॉँगचे बंदर या आठवड्यात बंद झाले आहे. तेथे कापसाची पाठवणूक भारतातून थांबली आहे. तेथून एलसी (लेटर ऑफ क्रेडिट) सूत, रुई निर्यातदारांना मिळत नसल्याने तेथील कापूस व्यापार थांबल्यात जमा आहे. 

भारताला संधी, पण निर्यात शुल्क मागे घ्या अमेरिका व्यापाराच्या दृष्टीने चीनव्यतिरिक्त इतर देशांकडे पाहत आहे. त्यासाठी इतर देशांना मजबुतीने, दर्जेदार काम करावे लागेल. भारताला अमेरिकेसोबत कापड व्यापार करण्याची संधी आहे. अमेरिका चीन ऐवजी व्हिएतनाम, बांगलादेश व तुर्की या देशांना  प्राधान्य देईल. व्हिएतनामकडून अमेरिका अधिकची खरेदी करील, असे संकेत आहेत. व्हिएतनाममधील व्हिनटेक्स व इतर कापड उत्पादक संस्था अमेरिकेच्या ब्रॅण्डसाठी काम करतात. अमेरिका व्हिएतनामकडून कापड आयात वाढवू शकतो. भारतसोबत अमेरिकेचा कापसाचा कुठलाही व्यापार नाही, कारण अमेरिकेत वस्त्रोद्योग नाही. पण अमेरिकेत भारतीय कापडाची पाठवणूक काही दाक्षिणात्य मिलसह उत्तरेकडील निर्यातदार करतात. परंतु अमेरिकेतील कापडाचा व्यापार कमी आहे. कारण तेथे कापड पाठविण्यासाठी भारतीय निर्यातदार, मिलना १० टक्के निर्यातशुल्क द्यावे लागते. हे शुल्क कमी झाल्यास भारतीय कापडाची निर्यात अमेरिकेत वाढू शकते. 

बालमजुरांच्या वापराचे कारण चीनमध्ये शिनजियांग प्रांत कापूस उद्योग, व्यापारासाठी ओळखला जातो. अफगणिस्तानला लागून असलेला हा भाग चीनचा पश्‍चिमी प्रदेश आहे. या भागात बालमजुरांचा वापर करून चीन कापड व कापसापासून इतर उत्पादने तयार करतो, असा दावा अमेरिकेच्या कस्टम्स अॅण्ड बॉर्डर प्रोटेक्शन संस्थेने केला आहे. शिनजियांगचा चीनच्या अर्थव्यवस्थेतील वाटा मोठा आहे. यापुढे चीनमध्ये निर्मित कापड खरेदी न करण्याची कडक भूमिका अमेरिकेने घेतली आहे, अशी माहिती मिळाली.

प्रतिक्रिया अमेरिकेसोबत भारताने कापड व्यापार वृद्धीसाठी पावले उचलायला हवीत. त्यासाठी मिल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्या पाहिजेत. अमेरिकेत कापड निर्यातीसाठी लागू असलेले १० टक्के निर्यातशुल्कही मागे घेतले पाहीजे. अमेरिका भारतीय कापडाचा मोठा ग्राहक नाही. अमेरिका चीन ऐवजी आता व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्कीला पसंती देईल. तसे झाल्यास भारतीय कापूस, सुताची निर्यात बांगलादेश, व्हिएतनाममध्ये वाढेल. भारतीय कापूस बाजारात सुधारणा लवकर होईल, असे दिसत नाही.  - महेश सारडा, अध्यक्ष नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन

अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातल्याने भारतीय कापूस बाजारात लागलीच मोठी सुधारणा होईल, असे मला वाटत नाही. कारण देशात आजघडीला १७५ लाख गाठी कापूस साठा आहे. तसेच आणखी कापूस उत्पादन देशात होणार आहे. अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा तीव्र होईल का, याचीही भीती वस्त्रोद्योगाला आहे.  - अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com