धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल !

Traders sell at Paddy Shopping Centers
Traders sell at Paddy Shopping Centers

भंडारा ः शासनाने हमीभावात तब्बल ७०० रुपयांची वाढ करून धानाला २५०० रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शासकीय हमीभाव केंद्रावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा धान पोचत केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. 

जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली. ७४ केंद्रांच्या माध्यमातून सुमारे सात लाख १ हजार ५८० क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आत्तापर्यंत विकलेल्या धानाचे ९० कोटी ३७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले. १५ हजार ९०७ शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्‍कम जमा करण्यात आली. सर्वसाधारण धानाला १८१५ आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये दर होता. त्यातच चुकारेदेखील वेळीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याला रोखीने धान विकण्यावर भर होता. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी आधारभूत केंद्रावरील गर्दी ओसरू लागली होती. 

महाविकास आघाडीकडून सुरुवातीला धानाला ५०० रुपयांचे बोनस जाहीर करण्यात आला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काळात पुन्हा २०० रुपयांची वाढ करीत सरसकट २५०० रुपये भाव धानाला जाहीर करण्यात आला. परिणामी आधारभूत धान केंद्रावर पुन्हा गर्दी वाढली आहे. शेतकऱ्यांनी खर्चासाठी रोख पैसे मिळतात म्हणून यापूर्वी सर्वसाधारण धान १६०० तर उच्च प्रतीचा धान २१०० रुपये क्‍विंटलने व्यापाऱ्यांना विकून टाकला होता. हा धान आता व्यापारी आधारभूत केंद्रावर विकून वाढीव दराचा फायदा घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

त्यामुळे वाढीव दराचा फायदा अपवादात्मक शेतकरी वगळले, तर व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे. आधारभूत केंद्रावर गर्दी वाढली असतानाच मिलिंगअभावी गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे अनेक केंद्रावर खरेदी ठप्प झाल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्याचे अन्न व नगरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक यांनी ८ नोव्हेंबर रोजी मिलर्सच्या नियुक्‍तीबाबत आदेश दिले होते. परंतु, जिल्हा पणन कार्यालयाकडून या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. साकोली तालुक्‍यातील ११ केंद्रांवर धान खरेदी होत आहे. वाढीव दरामुळे ठोकळ धानासोबत बारीक धानही केंद्रावर येत असल्याने उचल न केल्यास गोदामाअभावी ही केंद्र बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

धानाचे कोठार असलेल्या तुमसर तालुक्‍यातील अनेक केंद्रावर बारदाना संपल्याची ओरड आहे. १६ केंद्रांवर या तालुक्‍यात धान खरेदी केली जात आहे. पवनी तालुक्‍यातील पवनी, आसगाव चौ., अड्याळ, कोंढा, खातखेडा येथे धान खरेदी सुरू आहे. आत्तापर्यंत ४५ हजार ९३६ क्‍विंटल धान खरेदी करण्यात आले. परंतु, या ठिकाणीदेखील गोदामाचा अडसर खरेदी प्रभावित करण्याची भीती वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com