मुंबईत शेतकरी-ग्राहकांच्या नावावर प्रचंड नफेखोरी

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला आहे.
vegetable
vegetable

मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. यात शेतकरी तर आणखी भरडला जात आहे. थेट खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने व्यापारी माल घेत आहेत व चढ्या भावाने विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच लागत नाही व सर्वसामान्य नागरिकही दुप्पट-तिप्पट दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने हैराण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात केलेल्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील ही तफावत पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. शहरातील ग्राहक शेतीमाल खरेदी करतो, त्या वेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा आडते, व्यापारी शेतकऱ्यांकडून पडेल दरात शेतीमाल खरेदी करतात, हाच शेतीमाल मध्यस्थ साखळीद्वारे शहरात ग्राहकांना विकला जातो आणि अव्वाच्या सव्वा नफा मिळवितात. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आलेला माल शहर, उपनगरातील मॉल, गाळे आणि खुल्या ठिकाणी विक्री केला जातो. शेतकऱ्यांकडून अडत्यांकडे, अडत्यांकडून खरेदीदारांकडे आणि खरेदीदारांकडून मॉल, गाळे व किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीतील नफेखोरी ग्राहकापर्यंत जाते तेव्हा शेतकऱ्याला अल्प मोबदला मिळालेला असताना ग्राहकाला तो अधिक दरानेही खरेदी करावा लागतो, आज ही वस्तुस्थिती कायम आहे.  कोरोनामुळे राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. टाळेबंदीचा लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला, कडधान्य यांची दुकाने तसेच वाहतुकीस सरकारने परवानगी दिली आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक दूर करण्यासाठी सरकारने फळे-भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याचाच फायदा उठवत थेट खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.  लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना मागील पंधरवड्यात अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतातील काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता लॉकडाऊन असल्यामुळे आहे तो माल बाजारात नेता येत नाही. तो व्यापाऱ्याला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. याचाच गैरफायदा काही व्यापारी घेत असल्याचे दिसून येते. दुप्पट-तिप्पट भावाने विक्री लॉकडाऊनच्या निमित्ताने काही व्यापारी शेतकऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये बहुतांश भाजीपाल्यांचे दर हे वाढले आहेत. याचा लाभ उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळायला हवा होता. मात्र, तो लाभ शेतकऱ्यांयांना नव्हे तर व्यापाऱ्यांना होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणचे घाऊक बाजार चालू-बंद अशा स्थितीत आहेत. थेट खरेदीच्या नावाखाली काही नफेखोर वृत्तीचे व्यापारी याचा लाभ उठवत अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेतात. व तोच ग्राहकांना दुप्पट-तिप्पट भावाने विकत आहेत. जे टॉमॅटो शेतकऱ्यांकडून अवघ्या पाच ते दहा रूपयात खरेदी केले जातात, त्याची विक्री व्यापारी ५० ते ८० रुपये किलो दराने करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com