सातपुड्यात पारंपरिक वाणांच्या संवर्धनासाठी चळवळ

जळगाव : सातपुड्याच्या अतिदुर्गम धडगाव (जि. नंदुरबार) भागात देशी वाणांचे अभ्यासक प्रा. डॉ. एच. एम. पाटील व त्यांच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाणांच्या संवर्धनासह वितरणासाठी सीड बँका तयार केल्या आहेत.
Of the traditional varieties in Satpuda Movement for conservation
Of the traditional varieties in Satpuda Movement for conservation

जळगाव : सातपुड्याच्या अतिदुर्गम धडगाव (जि. नंदुरबार) भागात देशी वाणांचे अभ्यासक प्रा. डॉ. एच. एम. पाटील व त्यांच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाणांच्या संवर्धनासह वितरणासाठी सीड बँका तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांना या वाणांचे  मोफत वितरण केले जाते. गेल्या पाच वर्षात सुमारे एक हजार शेतकरी, अभ्यासकांना त्यांनी तांदूळ, ज्वारी, बाजरी आदींच्या देशी वाणांचे वितरण केले आहे. या देशी सीड बँक उपक्रमाचे हळूहळू चळवळीतच जणू रूपांतर होत आहे.  

डॉ. एच. एम. पाटील हे सध्या धडगाव येथे महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य व श्री. वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. शेतकरी कुटुंबातील सदस्य आणि विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने सुरुवातीला शहादा (जि. नंदुरबार) येथे कार्यरत असताना त्यांनी साक्री, नवापूर व धडगाव परिसरातील पिकांचा अभ्यास केला. यातील वैविध्यता, पारंपरिकता, त्यांचे महत्त्व टिकून राहवे, यासाठी त्यांनी काम सुरू केला. यातूनच त्यांनी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीसाठी त्यांनी ‘ट्रायबल इकॉलॉजी अॅण्ड क्रॉप प्लॅन्ट बायोडाव्हर्सिटी ऑफ नंदुरबार डिस्ट्रीक्ट’ हा विषय निवडला. 

नंदुरबार जिल्ह्यातील पिकांची जैवविविधता, त्याचे महत्त्व आदी मुद्द्यांवर त्यांनी सखोल अभ्यास केला. १९९९ मध्ये यासंबंधीचे संशोधन सुरू केले. २००७ मध्ये त्यांनी यात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी मिळविली. शेती, मातीचे मुद्दे लक्षात आल्यानंतर त्यांनी अभ्यासलेल्या वाणांचे संवर्धन व्हावे, इतर जिज्ञासू, अभ्यासू शेतकऱ्यांना हे वाण उपलब्ध व्हावेत, यासाठी काम सुरू केले. त्यासाठी सातपुड्यातील बाजरी, ज्वारी, मका, राला, भरटी (भगर), मोर, कोद्रा, वाल, चवळी, भादी, मूग, उडीद, तांदूळ आदी धान्य व भाजीपाला वाणांसह बेहडा, हिरडा, गुळवेल, भुईआवळा, बेलफळ, करंज आदी वृक्षांच्या बियांचे संवर्धन सुरू केले. २०१० मध्ये हे काम सुरू झाले. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांच्या माध्यमातून वाण गोळा केले. धडगाव येथे वळवी महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर या कामास अधिकचा वेग आला.

डॉ. काकोडकरांकडून कौतुक

२०१५ पासून पारंपरिक वाण, बियाण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयातच सुरू केले. या प्रदर्शनाला सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी भेट दिली. शहादा येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित युवारंग या युवा महोत्सवातही हे प्रदर्शन आयोजिण्यात आले. त्या वेळी अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

पाच सीड बँका; ४५५ प्रकारची वाण

आजघडीला सीड बँकेची चळवळ वाढून पाच सीड बँका तयार झाल्या आहेत. सर्व सीड बँका धडगाव तालुक्यात धनाजे, मांडवी खुर्द, रुणमलपाडा, कुकलट पाडा व रोषणाळ येथे आहेत. यातील चार सीड बँका विद्यार्थ्यांकडे व इक सीड बँक धडगाव तालुक्यातच एका शेती, मातीच्या अभ्यासकाकडे आहे. मांडवी खुर्द येथील सीड बँक बऱ्यापैकी मोठी आहे. ४५५ प्रकारची वाण या सीड बँकांमध्ये आहेत. त्यात तांदळाचे १८, ज्वारीचे १५ वाण आहेत. तांदळाच्या वाणांमध्ये सातपुडा, नवापुरातील लाल, काबरी, मोठी हाल, रोपण्या, साधीहाल, बरड्या, गुईडा, टाइचुंग आदी वाण आहेत.  

लोकसहभागातून जलसंवर्धन, जनजागृतीवरही काम

डॉ. एच. एम. पाटील यांनी कुठलेही अनुदान, मोठ्या देणगिशिवाय आपले सीड बँकेचे काम सुरू ठेवले आहे. सातपुड्यात प्लॅस्टिकमुक्तीवरही काम सुरू आहे. धडगाव व परिसरातील दुर्गम भागात जलसाक्षरतेचे कामही झाले. यामुळे सुमारे २०० एकर क्षेत्र हंगामी (रब्बी) बागायती झाले आहे. सातपुड्यातील लुप्त होणाऱ्या वृक्षांच्या बियांचा संग्रह करून रोपवाटिका निर्मितीही सुरू केली. शिवाय, बांबू कारागीर वाढण्यासाठीदेखील कार्यक्रमांचे आयोजन डॉ. पाटील यांनी सातत्याने केले.  

  •     वाणांमध्ये वाल, चवळीचेही अनेक प्रकार. 
  •     भादीमध्ये चिकणी भादी, साधी भादी असे प्रकार 
  •     पारंपरिक वाणांना आता जळगाव, शहादा व इतर                भागातूनही मागणी
  •     पारंपरिक वाणांचा प्रसार सातपुड्यातही वाढला
  •     शेतकऱ्यांना बियाण्याच्या बदल्यात पैसे मागितले जात          नाहीत, त्या ऐवजी शेतकऱ्याला संबंधित वाणाचे उत्पादन       आल्यावर त्यातील धान्य, बिया परतावा म्हणून घेतल्या           जातात.
  •     कुठल्याही वाणाचे बियाणे सध्या काही किलो किंवा काही     ग्रॅमच पुरविण्याची सीड बँकांची क्षमता
  •    अधिकाधिक शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात बियाणे               वितरणासाठी सीड बँकांमध्ये वाण मोठ्या प्रमाणात गोळा       करण्याचाही प्रयत्न
  •     सीड बँका विद्यार्थ्यांच्या घरानजीकच एका झोपडीवजा          पत्रांच्या घरात आहेत. 
  • डॉ. एच. एम. पाटील यांच्या सातपुडा, नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक वाण, लुप्त होणारे वृक्ष या संबंधीचे शोधप्रबंध शेतीसंबंधीच्या राष्ट्रीय संस्था काही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत मंडळीनी प्रसिद्ध  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com