अर्धबंदिस्त शेळीपालनाचे ५५ महिलांना प्रशिक्षण

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे ५५ महिलांना प्रशिक्षण
अर्धबंदिस्त शेळीपालनाचे ५५ महिलांना प्रशिक्षण

जालना : कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे २७ ते ३० मार्चदरम्यान महिलांकरिता अर्धबंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात कचरेवाडी, वानडगाव, राममूर्ती येथील ५५ महिलांनी सहभाग नोंदवला. 

दुष्काळात शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. या उद्देशाने व त्यांचा स्वयंरोजगार वाढविण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शेळीपालन प्रशिक्षणात महिलांना शेळ्यांच्या जाती, शेळ्यांची निवड व सद्यःस्थितीतील शेळीपालनाचे महत्त्व व गरज याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. 

कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध जातीच्या शेळ्या यामध्ये सिरोही, जमनापारी, उस्मानाबादी व सोजत इत्यादी शेळ्यांची ओळख त्यांचे व्यवस्थापन महिलांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतले. नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे निवृत्त संशोधन संचालक डॉ. निळकंठराव भोसले यांनी महिलांना कमी खर्चात शेळीपालनातून जास्त मोबदला मिळवण्याचे सूत्र समजावून सांगितले. आपल्या ग्रामीण भागातील उस्मानाबादी शेळ्यांची निवड करून हा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. 

प्रशिक्षणादरम्यान या महिलांचे यशस्वी शेतकऱ्यांचे शेळीपालनास भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रेवगाव येथील शेळ्यांचे संगोपन करणारे आनंदा कदम, शिंदी काळेगाव येथील दत्ता अप्पाजी गिराम यांनी केलेल्या एक शेळीपासून वर्षात शेळ्यांचे संगोपन करून दीड लाखाचा आर्थिक फायदा कसा झाला हे सांगितले. महिलांनी खरपुडी येथील शेजूळ यांच्या शेळीपालनास भेट देऊन तेथील शेळ्यांचे आहार व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली. शेळीपालनाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करणे व विविध शासकीय योजना या विषयी महाराष्ट्र ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जालना येथील कैलास तावडे यांनी मार्गदर्शन केले. 

हिवर्डी येथील पुंजाराम भुतेकर यांनी शेळीपालनातून मिळणाऱ्या लेंडीखताचे महत्त्व महिलांना पटवून दिले. शेळीपालन व्यवसायास आधुनिक पद्धतीची जोड देऊन तसेच प्रक्रियेवर भर देऊन महिलांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे निवृत्त प्राचार्य बी. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले. शेळीपालनातील आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, व आहार व्यवस्थापन यांचे महत्त्व कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. हनुमंत आगे यांनी सांगितले.

माजलगाव येथील कृषी चिकित्सा व कृषी व्यवसाय प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रदीप साळवे यांनी शेळीपालनातील पिलांचा शून्य मरतूक व व्यवसायातील अडचणी व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली.महिलांनी आर्थिक फायद्यासाठी बचत गटनिर्मिती करून शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान शाखेच्या तज्ज्ञ संगीता गायकवाड यांनी केले. शेवटच्या दिवशी महिलांना प्रमाणपत्र देऊन सामारोप करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. हनुमंत आगे यांनी आभार मानले.

दुष्काळी परिस्थितीत महिलांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करून शेतीला पूरक व्यवसाय जोडण्याचे काम करावे. - एस. व्ही. सोनुने, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com