खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला ब्रेक

खासगी ट्रॅव्हल बसमधील मालवाहतुकीवर कारवाईची मोहीम कायमच सुरू असते, १५ डिसेंबरपासून आम्ही त्यासंबंधीची विशेष मोहीम घेणार आहोत. केवळ शेतीमालच नव्हे, तर सर्व प्रकारच्या माल वाहतुकीचा त्यात समावेश आहे. न्यायालयानेही यासंबंधी सूचना दिलेली आहे. नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागणार आहे. - संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण (मुंबई)
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला ब्रेक
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला ब्रेक

सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्याकडे प्रवाशांबरोबर काही प्रमाणात माल घेऊन धावणाऱ्या खासगी  प्रवासी बसच्या वाहतुकीला राज्याच्या परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. १५ डिसेंबरपासून त्यासाठी विशेष कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यासह पंधरा हजारांचा दंड वसूल करण्याचा आदेशही या कारवाईमध्ये देण्यात आला आहे. पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई, पुण्याकडे शेतमाल पाठवणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. पार्सलच्या नावाखाली अन्य प्रकारच्या माल वाहुतकीवर परिवहनने कारवाई करावी, पण शेतमालाला यातून सूट द्यावी, अशी मागणी आता पुढे येते आहे. राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मुंबई, पुणे या मुख्य बाजारपेठा आहेत. त्यामुळे शेतमाल वाहुतकीच्या शेकडो तरकारी गाड्या रोज मुंबई, पुण्याकडे धावत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर शेतमाल आहे, ते स्वतंत्रपणे किंवा तरकारी गाड्यांमधून शेतमाल या बाजारपेठांमध्ये पाठवात. पण जे शेतकरी अगदी छोटे आहेत, ज्यांच्याकडे कमी म्हणजे १०-२० बॉक्‍स किंवा पोती असा शेतमाल निघतो, त्यांना या गाड्या किंवा त्यांचे भाडे परवडत नाही, ते त्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. त्यामुळे हे छोटे शेतकरी प्रामुख्याने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आधार घेतात. या बसच्या पाठीमागे किंवा डाव्या बाजूला असणाऱ्या लगेजच्या (सामान कक्ष) जागेत हे बॉक्‍स भरून ते मुंबई, पुण्याकडे पाठवतात.  पण परिवहन विभागाच्या या एका निर्णयाने आता या वाहुतकीला बंदी घालण्यात आली आहे. अर्थात, केवळ शेतमालच नव्हे, तर पार्सलच्या नावाखाली अन्य सर्व प्रकारच्या माल वाहुतकीला आरटीओंकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी खास असे वर्गीकरण करण्यात आलेले नाही. पण यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना त्याची सर्वाधिक झळ बसणार आहे.  विशेषतः नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड, नाशिक, औरंगाबाद या भागातील शेकडो बस प्रामुख्याने या मार्गावर धावतात. तसेच काही गाड्या शेजारच्या राज्यातील तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील विजापूरकडेही धावतात. यापैकी सर्वच गाड्यांमध्ये शेतमाल असतो असे नाही, पण किमान या वाहतुकीतून शेतमालाला सूट द्यावी, अशी मागणी होत आहे. न्यायालय म्हणते... फक्त टपावरून वाहतूक नको खासगी प्रवासी बसमधून होणाऱ्या माल वाहतुकीबाबत २०११ मध्ये उच्च न्यायालयामध्ये यासंबंधी एक याचिका दाखल झाली होती. त्या वेळी न्यायालयाने पार्सल वा अन्य माल वाहतूक केवळ सामान कक्षातून करण्यास हरकत नाही, परंतु गाड्यांच्या टपावरच्या वाहतुकीमुळे बसमधील प्रवासी तसेच रस्त्यावरील अन्य प्रवाशांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे टपावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करू नये, असे न्यायालयाने सुनावले होते. याच मुद्द्यावर पुन्हा हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. पण, तिथे उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम करण्यात आला. पण, आता आरटीओकडून मात्र सरसकट माल वाहतुकीलाच बंदी घालण्यात येत आहे. प्रतिक्रिया माझ्याकडे सध्या रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू आहे. आधी कोरड्या दुष्काळातून बाहेर निघालो, नंतर ओल्या दुष्काळातही मिरचीचे धाडस केले. सध्या दर चांगला आहे, पण उत्पादन तेवढे नाही, एक दिवसाआड २० ते ३० बॉक्‍स निघतात. पण बॉक्‍स कमी असल्याने तरकारी गाड्यांमध्ये पाठविणे परवडत नाही, ते बसमधून पाठवतो, पण आता बसवाल्यांनी रविवारपासून माल नेणार नाही, असं सांगितलं आहे. शेतकऱ्याला सगळ्या बाजूने चोपण्याचं काम सुरू आहे. - धनंजय हजारे, शेतकरी, मंगळवेढा

वाशी मार्केटमध्ये आरटीओंनी दोनच दिवसांपूर्वी आमच्या गाड्या तपासल्या. यापुढे शेतीमाल वाहतूक करायची नाही, अशी ताकीद दिली आहे. रविवारपासून कारवाई केली जाणार आहे, असंही सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. - सतीश नागणे, मालक, खासगी ट्रॅव्हल बस, मंगळवेढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com