दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवाना

दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवाना
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवाना

नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. नाशिक जिल्ह्यात आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मात्र फारसा परिणाम जाणवला नाही. सोमवारी (ता.१६) जिल्ह्यातील संकलन केंद्रात दूध संकलन करण्यात आले असून, सकाळपासून १५ दूध टँकर पोलिस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

तसेच, दूध संघांना आवश्यकता भासल्यास पोलिस बंदोबस्त देण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे. याकरिता स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान द्यावे आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून मुंबई शहराचा दूधपुरवठा बंद करत दूधकोंडी केली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी टँकर अडवून तोडफोड केली आहे. तर, काही ठिकाणी रस्त्यावर दूध ओतले आहे. दुसरीकडे सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीवर शेट्टी ठाम आहेत. नाशिक जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये दूध टँकर अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील दूध संघांची बैठक घेण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात प्रतिदिन १ लाख ३० हजार लिटर दूधाचे संकलन केले जाते. त्यापैकी ५० हजार लिटर दुधाचा पुरवठा नाशिक शहरासाठी केला जातो. उर्वरित दूध हे मुंबईला पाठवले जाते. नाशिक जिल्ह्यापेक्षा नगर जिल्ह्यातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा होतो. दोन्ही जिल्ह्यांमध्ये ४७ दूध संघ आहेत. त्यापैकी १३ संघ हे नाशिक जिल्ह्यातील आहे. सर्व संघांना दूध संकलन सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कक्ष कार्यान्वित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध रस्त्यावर ओतून देणे, दुधाचे टँकर फोडणे या प्रकारामुळे भीतीपोटी अनेक शेतकरी दूध बाजारात आणत नाहीत, त्याचा परिणाम संकलनावर होतो. मात्र, आता संकलन केंद्राना पोलिस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता दूध संघांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, याकरिता ०२५३/२३१७१५१ किंवा २३१५०८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com