गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

विदर्भाच्या पंढरीतील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त तथा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. ४) निधन झाले.
Trustee of Gajanan Maharaj Sansthan Shivshankarbhau Patil passed away
Trustee of Gajanan Maharaj Sansthan Shivshankarbhau Patil passed away

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त तथा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. ४) निधन झाले. मृत्युसमयी ते ८२ वर्षांचे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. बुधवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

श्री. पाटील यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीर होती. त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ झालेली असताना त्यांनी कुठल्याही मोठ्या रुग्णालयात भरती होण्यास नकार दिला. त्यामुळे घरीच डॉक्टरांमार्फत उपचार केले जात होते. निधनाचे वृत्त पसरताच सर्वस्तरांतून शोकाकूल प्रतिक्रिया उमटत आहेत. सायंकाळी निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शेगावमध्ये दाखल झाले. तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत आहेत.

स्वच्छता, पारदर्शी व्यवहार, भाविकांसाठी सुविधा देण्यात संत गजानन महाराज संस्थानचा लौकिक होता. यामागे शिवशंकरभाऊ पाटील यांचे योगदान होते. भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा सर्वत्र वाखाणण्यासारखी आहे. शिस्तप्रियता, त्यांचे नियोजन शेगाव विकासासाठी केलेले कार्य, भाविकांसाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे शिवशंकरभाऊ यांच्या कार्याबाबत सर्वत्र आदर होता. त्यांच्या कामांचा लौकिक मागील काही वर्षात देशभर पसरला होता.

विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठांमध्येही त्यांचे चांगले संबंध होते. काही काळ त्यांनी शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही भूषविले. शेगाव शहर विकासाचा आराखडा शासनाने मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी, शहराचे वैभव वाढविण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले होते. शेगाव संस्थानने आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्‍वरसह इतर मोठ्या ठिकाणी मोठमोठी मंदिरे, भक्तनिवास उभारले आहेत. तेथेही समाजसेवेचा वसा अविरत सुरू आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेकांनी अभ्यास केला. पारदर्शी व्यवहारामुळे संस्थानच्या मदतीसाठी भाविक सातत्याने पुढे येत असतात. असंख्य हात संस्थानच्या सामाजिक सेवा चालविण्यासाठी पाठबळ देत आहेत. अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पाटील यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब, वंचिताची सेवाही केली. संस्थानाच्या कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तिमंत रूप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com