मांजरपाडा प्रकल्पाचा बोगदा पूर्ण

मांजरपाडा प्रकल्प
मांजरपाडा प्रकल्प

नाशिक  : अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी वळविणारा राज्यातील पहिला प्रकल्प असून, १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी महाराष्ट्रात आणण्यात १३ वर्षांनंतर यश आले आहे. या बोगद्यातून पश्चिमेकडून पाणी वळून पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोगद्यातून प्रथमच पाणी वाहिले.  पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांमुळे जलसंपदा विभागाने २४ नोव्हेंबर २००६ ला मांजरपाडा योजनेला मंजुरी दिली. पश्चिमवाहिनी- पूर्ववाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले, तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजूला गोदावरी खोऱ्यात वळविणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.  मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले आहे. या योजनेद्वारे ६०६ दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी ३४५० मीटर इतकी असून, समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी ७२२ मीटर व पूर्णसंचय पातळी ७१८ मीटर आहे. धरणाच्या एकूण लांबीत एकूण १२ नाले अडविण्यात आले आहे. सदरचे पाणी १.२० कि.मी. लांबीचा जोड बोगदा व ८.९६० कि.मी. लांबीचा वळण बोगदा, असे एकूण १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे पुढे उनंदा नदीतील ३.२० कि.मी. लांबीच्या उघड्या चऱ्यांद्वारे मौजे हस्ते या गावाजवळ उनंदा नदीत सोडण्यात येणार आहे. ते पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाद्वारे चांदवड व येवला तालुक्यांत वितरित करण्यात येणार आहे. आगामी काळात पार गोदावरी या नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविले जाणारे पाणीसुद्धा याच बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे. असा आहे मांजरपाडा प्रकल्प

  •  बोगद्याची लांबी:१०.१६ किलोमीटर 
  •  पार नदीवरील बंधाऱ्याची क्षमता: २६७ दशलक्ष घनफूट 
  •  मांजरपाडा प्रकल्पाची क्षमता: ६१० दशलक्ष घनफूट 
  •  बोगद्याची वहनक्षमता: २४३ क्युसेक 
  •  बोगद्यातून वळणारे पाणी: पार नदीसह १२ नाले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com