तुर खरेदी : नाफेडच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका

तुर खरेदी : नाफेडच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका
तुर खरेदी : नाफेडच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांना फटका

यवतमाळ ः खरेदी -विक्री संघांनी थकीत कमिशनच्या मुद्द्यावर हमीभाव खरेदीवर बहिष्कार घातल्याचा फटका जिल्ह्यातील हजारावर तूर उत्पादकांना बसत आहे. ही संधी साधून व्यापाऱ्यांकडून देखील हमीभावापेक्षा सुमारे ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल कमी दराने खरेदी केली जात आहे. याप्रकरणी लवकर तोडगा काढून खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   नाफेडच्या माध्यमातून २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षात हरभरा व तूर खरेदी करण्यात आली. याकरिता जिल्ह्यातील १५ खरेदी विक्री संघाची एजंट म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. परंतु या दोन्ही वर्षांतील कमिशनचे ५ कोटी १० लाख रुपये नाफेडने आजवर दिले नाहीत. हे पैसे मिळाल्याशिवाय या वर्षात खरेदी न करण्याचा निर्णय जिल्ह्यातील खरेदी विक्री संघांनी घेतला. निदान हमाली, गाडी भरणे, थप्पी लावणे यावरील खर्च तरी मिळावा, अशी मागणी संघांनी नाफेड, जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांकडे केली. परंतु त्याकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे खरेदी सुरू झाली नाही.  शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसा नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या संधीचे सोने करीत व्यापाऱ्यांकडून ४८०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. खरेदीपोटी संस्थांना सुरवातीला शेकडा ३० पैसे कमिशन होते. त्यात वाढीची मागणी झाल्यानंतर २०१७-१८ पासून कमिशन एक टक्‍का करण्यात आले.  संघांनी पैशांसाठी विविध आंदोलने केली. त्याची दखल घेत अडव्हॉन्स म्हणून २८ लाख रुपये १६ खरेदी केंद्रासाठी देण्यात आले. परंतु तितक्‍या भागणार नाही; उर्वरित रकमेचा निकाल लावा, तोवर खरेदी न करण्याची भूमिका संघांची आहे. अशी आहेत केंद्रे राळेगाव, बाभूळगाव, घाटंजी, यवतमाळ, उमरखेड हे पाच केंद्रे विदर्भ को-ऑपरेटिव्हकडे आहेत. दारव्हा विविध सहकारी सोसायटी, तर उर्वरित दहा संस्था या सेवा सहकारी संस्था आहेत. या सर्व १६ संस्थांच्या माध्यमातून हमीभाव खरेदी होते. शासकीय खरेदी अभावी बाजारात तुरीचे दर कोसळले. त्यामुळे तूर उत्पादकांना क्‍विंटलमागे ८०० ते १००० रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. शासनाने या प्रकरणी लवकर तोडगा काढावा - संदीप सावरकर, तूर उत्पादक शेतकरी, कामठवाडा, ता. कळंब, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com