खानदेशात तूर आवक वाढली

खानदेशात तूर आवक वाढली
खानदेशात तूर आवक वाढली

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक या आठवड्यात वाढली आहे. सर्वाधिक आवक मुक्ताईनगर, अमळनेर व शिरपूर (जि.धुळे) येथील बाजारात होत असून, दर ४२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. शासकीय तूर खरेदी अजून सुरू झालेली नसल्याने बाजारात तूरदरांवर दबावाची स्थिती आहे.  जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. मात्र तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत ५५० ते ६०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  अशातच मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव या भागांत तुरीची अधिकची लागवड केली जाते. या भागात तुरीचे उत्पादन हाती आले असून, या भागातील बाजारात आवक वाढली आहे. अमळनेरच्या बाजारात सध्या प्रतिदिन ३०० क्विंटलपर्यंत तूर आवक होत आहे. तेथे कमाल दर ५००० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच मिळाला आहे. अर्थातच हमीभावापेक्षा कमी दर आहेत. शासकीय खरेदी सुरू होण्याची तारीख जाहीर न झाल्याने बाजारातील तूर आवक वाढल्याचे सांगितले जात आहे. तुरीला ५८०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव आहे. परंतु एवढा दर यंदा कुठेही बाजारात आत्तापर्यंत मिळालेला नसल्याची माहिती शेतकरी रमेश पाटील (पिंप्री, जि. जळगाव) यांनी दिली.  जिल्ह्यात यंदा १४० टक्के पाऊस झाला. ऐन दिवाळीत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कापसासह ज्वारी, मका इतर पिकांचे नुकसान झाले. ज्वारीला कणसे लागून काढणीवर आली होती. अनेकांनी ज्वारी, मका काढून ठेवला. मात्र अतिवृष्टीने शेतातील ज्वारी काळी पडली. शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर काळी ज्वारी केंद्रावर नाकारली जाईल. यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलीच नाही. ज्यांची चांगली ज्वारी होती, अशा केवळ ४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मक्‍याची १४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.  अमळनेर, पारोळा, यावल आदी ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाली. त्यातील अमळनेर केंद्रावर ३७३ क्विंटल, पारोळा २८८, यावल २०० क्विंटल, अशी एकूण केवळ ८६१ क्‍विंटल ज्वारीची खरेदी झाली. ज्वारीबाबत जशी स्थिती झाली, तशी तुरीची व्हायला नको, कारण बाजारात दर कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

तूर खरेदीसाठी मंजूर केंद्रे ः जळगाव, चोपडा, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, भुसावळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com