बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा 

देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे. मात्र दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांची मागणी असल्याने दरात सुधारणा पाहायला मिळाली.
Tur inflows into the market increased; Rate improvement
Tur inflows into the market increased; Rate improvement

पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे. मात्र दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांची मागणी असल्याने दरात सुधारणा पाहायला मिळाली. मागील आठवडाभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. तर तुरीचे व्यवहार सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान झाले, अशी माहिती जाणकारांनी दिली. 

देशात बाजारात तुरीची आवक वाढत आहे. कर्नाटकात तूर आवक वाढली आहे. महाराष्ट्रातही वातावरण कोरडे होत असल्याने तूर काढणी वेग घेत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी मागील हंगामातील शिल्लक साठा आणि आयातीमुळे स्थानिक तुरीचे दर दबावात होते. मात्र नवीन तूर बाजारात येत असताना दरही सुधारत आहेत. दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्टची तुरीला मागणी वाढल्याने गेल्या सप्ताहात दर १०० ते १५० रुपयांनी सुधारले आहेत.

मागील हंगामात काही काळा तुरीचे दर चांगले होते. त्यातच शेतकऱ्यांनी माल रोखल्यानंतर दरात सुधारणा होते, हा अनुभव कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत आला आहे. त्यामुळे शेतकरी तुरीची विक्रीही विचारपूर्वक करत आहेत, असे सध्यातरी चित्र दिसत आहे. कारण जाणकारांच्या मते तूर काढणीला वेग आला असला तरी त्या प्रमाणात बाजारात आवक होत नाही. जाणकारांच्या मते मिलर्सकडे तुरीचा मोठा साठा नाही. त्यामुळे त्यांची खरेदी वाढत आहे. तसेच देशातील घटलेले उत्पादन, शिल्लक साठा आणि आयातीचे गणित पाहून स्टॉकिस्टही खरेदी उतरल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्रातील दराची स्थिती  महाराष्ट्राचा विचार करता गेल्या आठवड्यात तुरीला मागणी राहिली. राज्यात आठवडाभरात तुरीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे बाजार समितीतील व्यापारी सूत्रांनी सांगितले. या सुधारणेसह अमरावती येथे सरासरी ५ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीचे व्यवहार झाले. तर लातूर येथे ५ हजार ८०० ते ६ हजार ६०० रुपयांदरम्यान तुरीचे व्यवहार झाले. अकोला येथे ५ हजार ७०० ते ६ हजार ३०० रुपये आणि नागपूर बाजारात ५ हजार ९०० ते ६ हजार ४०० रुपयाने तूर विकली गेली. 

कर्नाटकात आवक वाढली  कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीची आवक वाढली होती. मात्र आवक वाढूनही दर टिकून आहेत. मागणी कायम राहिल्याने आवक वाढल्यानंतरही दरात प्रति क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेले आठवडाभर ५ हजार ६०० ते ६ हजार ६०० रुपयांदरम्यान दर राहिले. बीदर येथे ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांदरम्यान तुरीचे व्यवहार झाले. रायचूर येथे ५ हजार ६०० ते ६ हजार ६०० रुपये आणि यादगीर येथे ५ हजार ९०० ते ६ हजार ५०० रुपयाने तूर विकली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com