तूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह

तूर खरेदीला मुदतवाढ
तूर खरेदीला मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी विचारात घेता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार आता हमीभावाने तूर खरेदीला दोन आठवड्यांची मुदतवाढ केंद्र सरकारने दिली आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केली.  पुणे कृषी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अग्रिटेक समिट २०१८’चे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. जोत्सना शर्मा, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी तसेच मान्यवर होते. यावेळी शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी उद्योजकांना गौरविण्यात आले.  श्री. सिंह यावेळी म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्याची मुदत कमी पडत होती. केंद्र सरकारने आधीच्या दिलेल्या मुदतीनुसार १८ एप्रिल रोजी संपुष्टात आली आहे. मात्र, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून आपल्याशी संपर्क साधून खरेदीला मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली. त्यामुळे सरकारने खरेदीला अजून १५ दिवस मुदत वाढवून दिलेली आहे.” मोदी सरकारने शेतीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करीत कॉंग्रेस राजवटीवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जोरदार टीका केली. “गेल्या ४५ वर्षात या लोकांनी फक्त शेतकऱ्यांचे नाव घेऊन सत्ता भोगली. दिवसा तोंडात शेतकरी आणि रात्री फक्त घरे भरण्याची चिंता या लोकांना होती. आता कृषी क्षेत्रातील मूलभूत बदल करण्याचा आमचा प्रयत्न पाहून ही मंडळी झोपून जागे झाली असून, आम्हाला ४५ महिन्यांचा हिशेब विचारत आहे. शेतकरी आणि गरिबांना लुटणारे जेव्हा आम्हाला प्रश्न विचारात तेव्हा त्यांना नाही पण मलाच माझी लाज वाटते,” असे ते म्हणाले.  भारतीयांचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचा खिसा भरण्यासाठी त्यांना दीडपट भाव मिळाला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधानांचा आहे. त्यात अडचणी असल्या तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न आम्हीच ऐरणीवर घेतला. देशाची तिजोरी शेतकऱ्यांच्या पैशांची आहे. त्यातून पैसे गेले तरी चालतील, पण हमीभावाने खरेदी झाली पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांची आहे. आम्ही हमीभावाबाबतदेखील काही धोरणात्मक निर्णय लवकरच घेणार आहोत, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

विद्यापीठे काय काम करतात ः खोत  ‘अग्रिटेक समिट २०१८’मध्ये झालेल्या चर्चेत राज्यातील मंत्र्यांनीदेखील बेधडक मते मांडली. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, “शेतकऱ्यांनी जादा पिकवले तरी त्यांना शेवटी आत्महत्येच्या मार्गाने जावे लागते. जादा पिकवलेले निर्यात होण्यासाठी दीर्घकालीन धोरण हवे. मी सरकारमध्ये असलो तरी मला खेदाने म्हणावे लागते की असे धोरण नाही. नुसत्या योजना ही मलमपट्टी आहे. ग्रामीण भागाला प्राधान्य आणि शेतीमध्ये उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत लागतील. कृषी विद्यापीठे काय काम करतात हे मला कृषी खात्याचा मंत्री असूनदेखील माहीत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर संशोधन कसे जाईल याची दखल विद्यापीठांना घ्यावी लागेल, असे श्री. खोत म्हणाले. 

विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मॉडेल शेती करावी ः देशमुख  “राज्याच्या कृषी विद्यापीठांमधून हजारो मुले कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र, यातील एक टक्काही मुले शेती करीत नाहीत. विद्यापीठांनी आपल्या हजारो एकरच्या फार्ममध्ये या विद्यार्थ्यांना किफायतशीर शेतीचे मॉडेल विकसित करून घेण्याचे बंधन घालावे. तरुण पिढी शेतीकडे वळाली पाहिजे. त्यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे श्री. देशमुख म्हणाले. 

उद्योग नफ्यात आणि शेती तोट्यात का ः जानकर  पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर म्हणाले, “उद्योग नफ्यात असताना शेती मात्र तोट्यात का जाते याचे चिंतन शास्त्रज्ञांसह कृषीमधील बुद्धिजिवी वर्गाने केले पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी हे कायदे तयार करणे किंवा निधी उपलब्ध करून देण्याचे काम करतो. मात्र, शेतीसाठी निश्चित काय करावे याचे उपाय सूचविण्याची जबाबदारी बुध्दिजिवींची आहे. आयएएस अधिकारी दीड लाखाच्या वर पगार घेत मंत्रालयात बसून आम्हाला उपाय सांगत नाहीत. त्यामुळे लोक आमच्या गाड्या अडवून जाब विचारतात. शेतकरी समृद्ध झाला तर व्यवस्था टिकेल. त्यासाठी निश्चित उपाय शास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी सूचवावेत.”  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com