यवतमाळमध्ये चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान

तूर खरेदी ठप्प
तूर खरेदी ठप्प
यवतमाळ  : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे १३ व व्हीसीएमएफची चार असे १७ केंद्रे तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली होती. मुदत संपण्यापूर्वीच यातील १२ केंद्रे बंद झाली असून, आठ दिवसांत नोंदणी झालेल्या ३० हजार शेतकऱ्यांची तब्बल चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान शासनासमोर निर्माण झाले आहे.
 
मागील वर्षी तूर खरेदी नियोजनाचे तीनतेरा वाजले. यंदा तरी नियोजन व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही मागील वर्षासारखीच परिस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व व्हीसीएमएफच्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली.
 
त्यासाठी जिल्ह्यात १७ केंद्रे होती. खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी पद्धत असल्याने मार्केटिंग फेडरेशनकडे ३२ हजार ९९१, व्हीसीएमएफकडे ११ हजार ५८९ अशा ४४ हजार ५८९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १५ हजार ३३७ शेतकऱ्यांची एक लाख ५० हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
 
१८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. अजून २९ हजार २२२ शेतकऱ्यांची तब्बल चार लाख क्विंटलच्या आसपास तूर खरेदी व्हायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. 
जिल्ह्यातील गोदामे फुल झालेली आहेत. परिणामी, दोन ते तीन दिवसांत सुरू असलेली पाच केंद्रे बंद होण्याची शक्‍यता आहे. गोदामात जागा नसल्याने सध्या खरेदी संथगतीने सुरू आहे. शिवाय, चुकाऱ्यांच्या ९० कोटींपैकी केवळ २६ कोटी रुपयांचेच वाटप झालेले आहे. 
 

 दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्या आहेत. कुठलेही नियोजन न केल्याने खरेदीचा बोजवारा उडाला आहे. अद्याप ३० हजार शेतकऱ्यांची तूर विकली गेलेली नाही. त्यामुळे तूर खरेदीसाठीची १८ एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख यांनी मंगळवारी (ता. १०) येथील पत्रकार परिषदेत केली.

या वेळी बाळासाहेब मांगुळकर, मनीष पाटील, बाबू पाटील वानखेडे, अरुण राऊत, रवींद्र ढोक, स्वाती दरणे, प्रा. घनश्‍याम दरणे, शशिकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, विकी राऊत आदी उपस्थित होते. 

सध्या ‘नाफेड’मार्फत अत्यंत संथगतीने तूर खरेदी सुरू आहे. त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाहेर ठेवावा लागत आहे. १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. त्यामुळे आठ दिवसांत ३० हजार शेतकऱ्यांची तूर शासन कशी खरेदी करणार, हा प्रश्‍न आहे.
 
परिणामी, तूर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी, चुकारे उशिरा दिलेल्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम द्यावी, खरेदी तुरीची उचल तत्काळ करावी, हरभऱ्यांची खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने धरणे दिले. या वेळी शेतकरी संघर्ष समिती, राजकीय पक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com