नगर जिल्ह्यात तूर उत्पादकतेत ७५ टक्क्यांनी घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा गंभीर परिणाम तूर उत्पादनावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा तूर उत्पादकतेत ७५ टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी तुरीची उत्पादकता हेक्टरी ८६५ किलो १४५ ग्रॅम होती. यंदा तुरीची उत्पादकता अवघी १७५ किलो ४७६ ग्रॅम आली आहे. कर्जत तालुक्यात सर्वांत कमी म्हणजेच ७२ किलो ४०३ ग्रॅम उत्पादकता आली आहे. कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगातून ही स्थिती समोर आली आहे. 

कृषी विभागातर्फे दरवर्षी पीक उत्पादकता ठरवण्यासाठी पीक कापणी प्रयोग केले जातात. त्यातून निघणाऱ्या उत्पादकतेवरच पीक विम्यासह विविध सरकारी लाभ देण्याचे सरकारचे नियोजन असते. यंदा नगर जिल्ह्यामध्ये तुरीची उत्पादकता ठरवण्यासाठी ३६८ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन केले होते. त्यातील ३४९ प्रयोगांच्या निष्कर्षातून ही माहिती उपलब्ध झाली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यामध्ये तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी (२०१७-१८) तर तुरीचे बंपर उत्पादन निघाले होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्हाभरात सरासरी हेक्टरी ८६५ किलो १४५ ग्रॅमचे उत्पादकता मिळाल्याचा अहवाल असली तरी, बहुतांश भागात बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन निघाले होते. बाजारात तुरीला हमीभावानुसार दर दिला जात नसल्याने तूर विक्रीचा प्रश्नही चर्चेत होता. सरकारने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करूनही शेतकऱ्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले होते. 

यंदा जिल्हाभर दुष्काळी स्थिती आहे. तुरीची पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने तुरीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जिल्ह्यात ३६१ पीक प्रयोगातून तुरीची उत्पादकता हेक्टरी ८६५ किलो १४५ ग्रॅम निघाल्याचे स्पष्ट झाले होते. यंदा हेक्टरी अवघी १७५ किलो ४७६ ग्रॅम उत्पादकता निघाली आहे. कर्जत तालुक्यात तुरीची उत्पादकता ७२ किलो ४०३ ग्रॅम आहे. गेल्या वर्षी कर्जत तालुक्यात १०५८ किलो ४७२ ग्रॅम उत्पादकता होती. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जत तालुक्यात तर ९० टक्‍क्यांपेक्षाही कमी उत्पादन निघाले आहे. नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यातही यंदा तुरीची उत्पादकता कमीच आहे.    

तुरीची हेक्टरी उत्पादकता (कंसात गतवर्षीची उत्पादकता)
 नगर  ७९.८३८ (७१८.९०३)
पारनेर ८२.४१७ (३९७.७८७)
श्रीगोंदा ५३५३.८३३ (९१७.६६७)
कर्जत ७२.४०३ (१०५८.४७२)
जामखेड २५८.१६७ (९७६.६८८)
शेवगाव ३६७.९३५ (९३४.४२७)
पाथर्डी  १०१.८४८ (११०७.५००)
नेवासा १६२.३६५ (११०७.७५०)
राहुरी १३२.५४२ (४८४.४४४)
संगमनेर २८७.५०० (१४७३.७५०)
अकोले (०)
कोपरगाव  २९६.५९१ (३९२.६५०)
श्रीरामपूर २९४.०५० (१२७२.२९२)
 राहाता  २१०.४७६ (१२३०.००)
जिल्हा एकत्रित  १७५.४७६ (८६५.१४५) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com